संघर्षमूर्ती सावित्रीमाई फुले

सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचे दुर्मिळ छायाचित्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव जेंव्हा मी घेते तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर अथांग वात्सल्याची संघर्षमूर्ती उभा राहते. या माऊलीने तेंव्हा संघर्षाच्या वाटेवरुन चालायचे नाकारुन मळलेली वाट स्वीकारली असती तर माझ्यासारख्या असंख्य महिला आजही चुल आणी मूल या चौकटीतच बंद राहिल्या असत्या. ही चौकट मोडून महिलांना समाजात बरोबरीचे स्थान निर्माण करुन देण्यासाठी आयुष्यभर झगडलेल्या महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या कार्यामुळे परंपरांच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला नवी दिशा मिळाली. त्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघे जणू अंधारात चाचपडत असणाऱ्या भारतीय समाजमनाला गवसलेले दीपस्तंभच. स्त्रीशिक्षणाची केवळ संकल्पना मांडून हे उभयता थांबले नाहीत तर त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. फातिमाबी शेख यांना सोबत घेऊन सावित्रीबाईंनी भिडेवाड्यात चालविलेल्या शाळेतून स्त्रीमुक्तीचा पहिला हुंकार दुमदुमला. त्यांच्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने तत्कालिन समाजव्यवस्थेबाबत लिहिलेला निबंध समाजाच्या तळाशी वर्षानुवर्षे साठलेल्या आक्रोशाचा पहिला आवाज ठरला. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते पिईल तो गुरगुरणारच’, अशी एक म्हण आहे. ही म्हण स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाल्यानंतर सार्थ ठरली. समाजाच्या विविध घटकांतून महिला शिक्षणासाठी बाहेर पडू लागल्या. हळूहळू स्त्रियांनी आपण प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करु शकतो हे सिद्ध करुन दाखविले. महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, याचे श्रेय सर्वस्वी फुले दांम्पत्याच्या प्रयत्नांना द्यावे लागेल. या अर्थाने ही जोडी आधुनिक भारताच्या इतिहासातील मानाचे पान ठरते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य महात्मा फुले यांच्या मृत्युपश्चातही सुरु होते. पुण्यात जेंव्हा प्लेगचा कहर झाला होता तेंव्हाच्या काळात सावित्रीबाईंनी रुग्णसेवेच्या कार्यात स्वतःला वाहून नेले. प्लेगच्या रुग्णाला जेथे डॉक्टर्स सुद्धा हात लावायला घाबरत तेथे सावित्रीबाईंनी त्या रुग्णांच्या संपुर्ण सुश्रुषेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रुग्णसेवेच्या कार्यात असतानाच त्यांना प्लेगने गाठले; यातच त्यांना मृत्यु आला. सावित्रीबाईंनी आपल्या जीवनकाळात संघर्ष, जनसेवा आणि कर्तव्याचा वस्तुपाठ घालून दिला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे जन्मलेली एक साधारण मुलगी सासरी गेल्यानंतर शिक्षणाचे धडे गिरविते, मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी आणि मुलींच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचणारी लोकोत्तर वीरांगणा ठरते हा सर्व प्रवास प्रेरणादायी आहे. देशातील सर्व महिलांनी सावित्रीबाईंच्या या कार्याची महती ओळखून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. सावित्रीबाईंचे कार्य केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित नाही. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन तत्कालिन सरकारने एक सकारात्मक सुरुवात केली होती. यापुढील पाऊल म्हणजे आता शासकीय स्तरावरुन आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवरुन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार, अध्यासन, शिष्यवृत्ती आदी बाबी प्रकर्षाने करण्याची गरज आहे. याद्वारे नव्या पिढ्यांना त्यांच्या कार्याची ओळख होईल. त्यातून प्रेरणा घेऊन नव्या विचारांची जपणूक करणारा, विज्ञाननिष्ठ समाज निर्माण होईल अशी मला आशा आहे. गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः फुले दांम्पत्याला भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी मी संसदेतही आवाज उठविला आहे. शिवाय महाराष्ट्र सरकारनेही यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाची दखल घेऊन या २६ जानेवारी रोजी त्यांना भारतरत्न जाहीर करावा अशी अपेक्षा आहे. ‘आधी आबादी’ असा उल्लेख केल्या जाणाऱ्या मनुष्यबळात अर्थात महिलांना शिक्षणाद्वारे सक्षम करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या फुले दांम्पत्यास भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरणार आहे. अर्थात यासाठी सत्ताधाऱ्यांनी तशी मानसिकता दाखविण्याची गरज आहे.

Read More
  357 Hits

क्रांतीचे अग्रदूत

देशातील लोकशाही व्यवस्था एवढी बळकट का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा जेंव्हा मी प्रयत्न केला तेंव्हा मला जाणवले की, येथे आहार-विहार-विचार आदींची विविधता असली तरी लोकसत्ताक मूल्यांबाबत जनता प्रचंड जागरुक आहे. ही जागरुकता एका दिवसात आलेली नाही तर ती सततच्या विचारप्रक्रियेतून येथील समाजमनात खोलवर रुजलेली आहे. यासाठी ज्या समाजसुधारकांनी प्रयत्न केले, त्यामध्ये महात्मा जोतीबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. लोकसभेत मी जेंव्हा त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर करण्याची मागणी केल्याचे वृत्त माध्यमांत आले, तेंव्हा त्याचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. काही माणसं ही पुरस्कारांपेक्षाही मोठी असतात. फुले दांम्पत्य हे त्यापैकीच एक आहे. त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर करणे म्हणजे खरेतर ‘भारतरत्न’चाच गौरव ठरणारा आहे. अर्थात त्यासाठी केंद्र सरकारने तशी मानसिकता दाखविण्याची आवश्यकता आहे. महात्मा फुले यांच्या मृत्यूला सव्वा शतकाहून अधिक काळ लोटला आहे. त्यांनी घालून दिलेल्या सत्यशोधकी पायवाटेचा आज महामार्ग झाला आहे. पण हे सर्व करताना त्यांना त्या काळात ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्यांची आता कल्पनाही करवत नाही. कर्मठ विचारांच्या प्रवृत्तींनी त्यांच्या अंगावर अक्षरशः मारेकरी घातले. सावित्रीबाईंना तर शेण आणि दगडांचा माराही सहन करावा लागला. पण तरीही या दोघांनीही आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. ज्या काळात मुलींनी शाळा शिकणे हे पाप समजले जात असे, धर्मशास्त्रानुसार त्यांना ज्ञानार्जनाची संधी नाकारण्यात आली होती, त्या काळात त्यांनी १८४८ साली स्त्रीशिक्षण आणि दलितांच्या शिक्षणाची व्यवस्था उभी केली. शुद्रातिशुद्र समाजासाठी त्यांनी नवी दृष्टी दिली. ज्ञानाचा नवा प्रकाश त्यांनी खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुला केला. यामागील त्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. हे महात्मा फुले यांच्या पुढील रचनेतूनच लक्षात येते. फुले म्हणतात.... विद्ये विना मती गेली । मती विना निती गेली ।। निती विना गती गेली । गती विना वित्त गेले ।। एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ।। महात्मा फुले यांच्या कार्याची महतीच सांगायची असेल तर मला इतिहासातील तीन मोठ्या व्यक्ती त्यांच्याबद्दल काय विचार करायच्या ते आवर्जून सांगावे लागेल. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फुल्यांना गुरुस्थानी मानायचे हे सर्वश्रृत आहेच. ‘फुल्यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू ’ असे ते अभिमानाने सांगायचे. पुण्यामध्येच १९३२ साली एका भाषणात महात्मा गांधी म्हणाले होते की, ‘जोतीराव फुले देशातील पहिले आणि खरे महात्मा होते’. तर सावरकरांनी त्यांचा उल्लेख करताना ‘समाज क्रांतिकारक’ असे विशेषण वापरले आहे. हे तिन्ही नेते एका विशिष्ट विचारसरणीचे नेतृत्त्व करतात; पण जेंव्हा ते फुल्यांबाबत बोलतात, तेंव्हा मात्र त्यांचे एकमत होते. अगदी अलीकडे येऊन बोलायचं झाल्यास, प्रख्यात विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी त्यांचा ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच जे शाळा बंद करण्याचे फर्मान सोडले आहे, ते वाचताना १८८२ साली महात्मा फुले यांनी हंटर आयोगाकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची केलेली मागणी आवर्जून आठवते. तळागाळातील जनता जर शिक्षित व्हायची असेल तर त्यांना शिक्षणाच्या सुविधा सहज उपलब्ध होतील अशा असल्या पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यांची भूमिका कित्येक दशके उलटून गेल्यानंतरही समर्पक वाटते. शिक्षणाबाबत त्यांच्या भूमिका आणि धारणा अगदी पक्क्या होत्या. त्या सखोल अभ्यासाअंती तयार झाल्या होत्या. शैक्षणिक गळतीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी १८५४ साली ‘प्रौढ शिक्षण अभियान’ सुरु केले होते. यामध्ये त्यांनी स्त्रीयांना शिक्षण कसे मिळेल याकडे आवर्जून लक्ष दिले होते. या सर्व कामांमध्ये सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना केवळ साथच दिली नाही तर त्यांच्या पश्चात आपल्या दत्तक मुलास सोबत घेऊन त्यांचे कार्य पुढे सुरुच ठेवले. यातून जी कार्यनिष्ठा दिसते तिला तोड नाही. पुण्यातील भिडेवाड्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील शिक्षिका सावित्रीबाई फुले याच होत्या. त्या जेंव्हा शिकविण्यासाठी जात तेंव्हा सनातनी विचारांचे गावगुंड त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करीत. त्यांच्या अंगावर शेण-दगड फेकून मारत. परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. जोतीबांनी दाखवून दिलेल्या वाटेवरुन त्या चालत राहिल्या. जर त्या वाटेवरुन सावित्रीबाई माघारी फिरल्या असत्या, तर स्त्रीशिक्षणाची पहाट उजाडण्यासाठी आणखी किती शतके वाट पहावी लागली असती, याची कल्पनाही करवत नाही. फुल्यांच्या या शाळेत शिकणाऱ्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने ‘मांगा महारांच्या दुःखा’विषयी लिहिलेल्या निबंधातून शिक्षणाचा प्रकाश वंचितांच्या अंधारविश्वात पडल्यानंतर त्यांच्या जाणीवांना कसे शब्द आले हे स्पष्ट होते. त्यानंतर स्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे, पहिली स्त्री संपादक तान्हुबाई बिर्जे अशा विद्यार्थिनी पुढे उदयास आल्या. त्यांच्या साहित्याची खोली पाहिली तर फुल्यांच्या विचारांची उंची सहज लक्षात येईल. शेतकऱ्यांच्या समस्यांची मांडणी करण्यासाठी त्यांनी लिहिलेले ‘गुलामगिरी’ हे पुस्तक आजही शेतकरी चळवळींसाठीच नव्हे तर संपुर्ण देशासाठी मार्गदर्शक असेच आहे. इंग्लंडचा राजकुमार 'ड्यूक ऑफ कॅनॉट' समोर देशातील जनतेचे खरे चित्र दाखविण्यासाठी शेतकऱ्याचा वेश...

Read More
  319 Hits