3 minutes reading time (532 words)

आम्हास वारसा शिवछत्रपतींचा… !

आम्हास वारसा शिवछत्रपतींचा… !

छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती… यानिमित्ताने त्यांना माझ्यासह संपूर्ण देश त्यांना मानाचा मुजरा करीत आहे. त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्यापुढे मान झुकविताना जन्म सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. या युगप्रवर्तक राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आजच्याच दिवशी झाला होता. सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असतानाही महाराजांनी शून्यातून सर्वसामान्यांचे राज्य उभे केले. सर्वांना समान संधी दिली. खऱ्या अर्थाने समतेचे तत्त्व त्यांनी आपल्या राज्यात बिंबविले. त्यांना आपल्यातून जाऊन शतके उलटली आहेत पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष जरी कानावर पडला तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. रयतेच्या हितासाठी सदैव दक्ष असणारा हा राजा अजूनही लोकांच्या मनामध्ये जीवंत आहे.

कुळवाडीभूषण शिवछत्रपतींनी केवळ एक राज्य उभं केलं नाही तर आत्मविश्वास हरवलेल्या मराठी माणसाला पुन्हा एकदा उभारी दिली. बहुजन समाजातील दुर्लक्षित घटकांना सोबत घेऊन शून्यातून स्वराज्य निर्माण करताना त्यांनी प्रस्थापितांना जाणीवपूर्वक हादरे दिले. त्यांनी सामाजीक अभिसरणाचे जे अनोखे मॉडेल त्या काळी उभे केले होते ते विशिष्ठ प्रवृत्तींना पुर्वीही आवडले नव्हते आणि आजही त्यांना ते पसंत नाही. त्यामुळेच महाराजांच्या मृत्युनंतर त्यांची समाधी महात्मा ज्योतीराव फुले यांनी शोधून काढेपर्यंतच्या काळात महाराजांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचाच प्रयत्न झाला. परंतु सत्य काळाच्या विवरात कितीही खोलपर्यंत दडवून ठेवलं तरीही ते लपून राहू शकत नाही एवढे त्याचे तेज प्रचंड असते. त्यामुळे महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून काढून शिवजयंतीला सुरुवात केल्यानंतर तीचा प्रसार मोठ्या वेगाने झाला. महाराजांच्या चरीत्रातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढ्यात वीरांचे जत्थेच्या जत्थे उतरले. महाराजांच्या विचारांची जादू ही एवढी प्रखर होती की, त्यानंतरच्या प्रत्येक समाजसुधारकांनी महाराजांच्या कार्यातूनच प्रेरणा घेतल्याचे प्रांजळपणे नमूद केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वांना हव्या असणाऱ्या आणि सर्वांचे हित जोपासणाऱ्या भारताची, समतेचे राज्य, सर्वांना न्याय देणारी व्यवस्था जेंव्हा उभारायची होती तेंव्हाही महाराजांच्या शासनव्यवस्थेचे आणि तंत्राचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवले गेले होते. महाराजांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती तेंव्हापासून महाराजांना बदनाम करण्यासाठी टपल्या होत्या. त्यातूनच त्यांच्या नावाने सवर्ण आणि दलित दंगली पेटविण्याचा घृणास्पद प्रयत्नही करण्यात आला पण तो सजग समाजानं उधळून लावला. त्यामुळेच या मंडळींचा पोटशूळ आणखीच वाढला. ओठांवर महाराजांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यांचा प्रभाव कशा प्रकारे संपवायचा याच्या योजना आखण्याचे उद्योग करायचे हा यांचा आवडता धंदा.

राज्यातील सत्ताधारी पक्षानेही निवडणूकीच्या काळात शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही सत्ता स्थापन करण्यास निघालो आहोत असा प्रचार केला होता. शिवरायांच्या नावाने मतांचा जोगवा त्यांनी मागितला. त्यांना जनतेने मतेही दिली. परंतु जेंव्हा ते निवडून आले तेव्हा मात्र ते महाराजानांच विसरले. आता त्यांच्याच पक्षाच्या अहमदनगर शहरातील श्रीपाद छिंदम या उपमहापौराने शिवरायांबद्दल अपशब्द काढून आपल्या विचारांची मळमळ बाहेर काढली. अर्थात छिंदम ही व्यक्ती सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्थेत तथाकथित उच्च विचारांचे आणि संस्कृतीरक्षणाचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेली आहे. अर्थात छिंदमचे प्रकरण ‘ ही मंडळी’ कशाप्रकारे विचार करतात याचे प्रातिनिधीक उदाहरण आहे. शिवरायांच्या पुण्यतिथीला यांच्याच विचारांचे लोक ढोल वाजवितात.

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा करुन ते रखडविले जाते. सिंदखेड राजा या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचा विकासही निधी अभावी रखडवला जातो. ही सर्व उदाहरणे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्थेत अशा प्रवृत्तीचा भरणा आहे हे गुपित यानिमित्ताने उघड झाले आहे. ओठात एक आणि पोटात एक अशी यांची स्थिती. यामुळेच आता या प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. सध्या याच विचारांच्या लोकांची सद्दी असली तरी छत्रपती शिवरायांच्या घोर अपमानानंतर आता त्यांची उलटगिणती सुरु झाली आहे. कारण जरी छिंदमने माफी मागितली तरी ते प्रकरण तेवढ्यावरच थांबत नाही. कारण त्याने संपुर्ण महाराष्ट्राचा आणि त्याच्या गौरवशाली परंपरेचा अपमान केला आहे.

त्यामुळेच खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या विचारांनी भारलेला मावळा अशा विचारांना पराभूत करण्यासाठी सदैव कार्यरत राहील याचा मला विश्वास आहे.

शिवरायांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. – सुप्रिया सुळे,  खासदार

आपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन