संघर्षमूर्ती सावित्रीमाई फुले

सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचे दुर्मिळ छायाचित्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव जेंव्हा मी घेते तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर अथांग वात्सल्याची संघर्षमूर्ती उभा राहते. या माऊलीने तेंव्हा संघर्षाच्या वाटेवरुन चालायचे नाकारुन मळलेली वाट स्वीकारली असती तर माझ्यासारख्या असंख्य महिला आजही चुल आणी मूल या चौकटीतच बंद राहिल्या असत्या. ही चौकट मोडून महिलांना समाजात बरोबरीचे स्थान निर्माण करुन देण्यासाठी आयुष्यभर झगडलेल्या महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या कार्यामुळे परंपरांच्या जंजाळात अडकलेल्या समाजाला नवी दिशा मिळाली. त्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघे जणू अंधारात चाचपडत असणाऱ्या भारतीय समाजमनाला गवसलेले दीपस्तंभच. स्त्रीशिक्षणाची केवळ संकल्पना मांडून हे उभयता थांबले नाहीत तर त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. फातिमाबी शेख यांना सोबत घेऊन सावित्रीबाईंनी भिडेवाड्यात चालविलेल्या शाळेतून स्त्रीमुक्तीचा पहिला हुंकार दुमदुमला. त्यांच्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने तत्कालिन समाजव्यवस्थेबाबत लिहिलेला निबंध समाजाच्या तळाशी वर्षानुवर्षे साठलेल्या आक्रोशाचा पहिला आवाज ठरला. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते पिईल तो गुरगुरणारच’, अशी एक म्हण आहे. ही म्हण स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाल्यानंतर सार्थ ठरली. समाजाच्या विविध घटकांतून महिला शिक्षणासाठी बाहेर पडू लागल्या. हळूहळू स्त्रियांनी आपण प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करु शकतो हे सिद्ध करुन दाखविले. महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, याचे श्रेय सर्वस्वी फुले दांम्पत्याच्या प्रयत्नांना द्यावे लागेल. या अर्थाने ही जोडी आधुनिक भारताच्या इतिहासातील मानाचे पान ठरते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य महात्मा फुले यांच्या मृत्युपश्चातही सुरु होते. पुण्यात जेंव्हा प्लेगचा कहर झाला होता तेंव्हाच्या काळात सावित्रीबाईंनी रुग्णसेवेच्या कार्यात स्वतःला वाहून नेले. प्लेगच्या रुग्णाला जेथे डॉक्टर्स सुद्धा हात लावायला घाबरत तेथे सावित्रीबाईंनी त्या रुग्णांच्या संपुर्ण सुश्रुषेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रुग्णसेवेच्या कार्यात असतानाच त्यांना प्लेगने गाठले; यातच त्यांना मृत्यु आला. सावित्रीबाईंनी आपल्या जीवनकाळात संघर्ष, जनसेवा आणि कर्तव्याचा वस्तुपाठ घालून दिला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे जन्मलेली एक साधारण मुलगी सासरी गेल्यानंतर शिक्षणाचे धडे गिरविते, मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी आणि मुलींच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचणारी लोकोत्तर वीरांगणा ठरते हा सर्व प्रवास प्रेरणादायी आहे. देशातील सर्व महिलांनी सावित्रीबाईंच्या या कार्याची महती ओळखून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. सावित्रीबाईंचे कार्य केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित नाही. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन तत्कालिन सरकारने एक सकारात्मक सुरुवात केली होती. यापुढील पाऊल म्हणजे आता शासकीय स्तरावरुन आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवरुन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार, अध्यासन, शिष्यवृत्ती आदी बाबी प्रकर्षाने करण्याची गरज आहे. याद्वारे नव्या पिढ्यांना त्यांच्या कार्याची ओळख होईल. त्यातून प्रेरणा घेऊन नव्या विचारांची जपणूक करणारा, विज्ञाननिष्ठ समाज निर्माण होईल अशी मला आशा आहे. गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः फुले दांम्पत्याला भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी मी संसदेतही आवाज उठविला आहे. शिवाय महाराष्ट्र सरकारनेही यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाची दखल घेऊन या २६ जानेवारी रोजी त्यांना भारतरत्न जाहीर करावा अशी अपेक्षा आहे. ‘आधी आबादी’ असा उल्लेख केल्या जाणाऱ्या मनुष्यबळात अर्थात महिलांना शिक्षणाद्वारे सक्षम करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या फुले दांम्पत्यास भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरणार आहे. अर्थात यासाठी सत्ताधाऱ्यांनी तशी मानसिकता दाखविण्याची गरज आहे.

Read More
  293 Hits