3 minutes reading time (535 words)

[ETV Bharat]पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?

पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?

सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल

मुंबई : "पुण्यात दादागिरीमुळं गुंतवणूक येत नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ही दादागिरी कोणाची आहे? याला जबाबदार कोण? पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. राष्ट्रवादीच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील दादागिरीमुळं गुंतवणुकीवर परिणाम होत असल्याची कबुली दिली असली, तरी त्यावर कारवाई का केली नाही, असा थेट सवाल त्यांनी केला. हिंजवडीसारख्या औद्योगिक केंद्रात 6 लाख रोजगार असूनही, सरकारच्या नाकर्तेपणामुळं नव्या गुंतवणुकी बाहेरच्या राज्यांत जात आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

आम्ही सरकारला सर्वतोपरी सहकार्य करू : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हिंजवडीतील अनेक प्रकल्प बंगळुरुला येत असल्याचं ट्विट केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पुण्यात दादागिरीमुळं गुंतवणूक येत नसल्याची कबुली दिली आहे. मग ही दादागिरी कोणाची आहे? याला जबाबदार कोण? त्यांच्यावर काय कारवाई करणार? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. ही दादागिरी मोडीत काढण्यासाठी आम्ही साथ देऊ, पण सरकारनं ठोस पावलं उचलावीत. पुण्याची सुसंस्कृत ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सरकारला सर्वतोपरी सहकार्य करू," असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

भडकाऊ भाषणं करणाऱ्यांना आवरा : यवत येथील घटनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील वाढत्या गुंडगिरीबाबत चिंता व्यक्त केली. "दौंड हा सुसंस्कृत भाग आहे. मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. पण बाहेरून येऊन कोणी आमच्या भागात गुंडगिरी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही. तसंच मी याविषयी स्थानिक आमदार राहुल कुल आणि पोलीस अधिक्षकांशी चर्चा करून माहिती घेतली. पालकमंत्र्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि भडकाऊ भाषणं करणाऱ्यांना आवर घालावा, " अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तसंच "महात्मा गांधींचा आदर्श पुढे ठेवत अशा प्रवृत्तींना आम्ही शांततामय मार्गानं प्रत्युत्तर देऊ," असंही त्या म्हणाल्या.

लोकांना वर्दीची भीती राहिलेली नाही : दरम्यान, महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सरकारचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, "दोन वर्षांनंतर का होईना, सरकारला जाग आली. या निर्णयाचं स्वागत आहे. मात्र, पुण्याप्रमाणं बीडमध्येही लोकांना वर्दीची भीती राहिलेली नाही. महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा गुन्हेगारी आटोक्यात आणण्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं", असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

कोकाटेंच्या खातेबदलावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : विधानसभेच्या सभागृहात रमी खेळल्यामुळं माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरुन अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषीमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे दत्तात्रय भरणे यांच्या क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "रमी रावमुळं संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. या गंभीर प्रकारानंतर संबंधित मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता. पण या सरकारकडून फार अपेक्षा नाहीत", असा चिमटाही सुप्रिया सुळे यांनी काढला.

'काँग्रेसमुक्त भारत'च्या घोषणेचं काय झालं? : सुप्रिया सुळे यांनी भाजपावरही टीका केली. त्या म्हणाल्या, "परवा दिल्लीत भाजपाचा एक ज्येष्ठ नेता मला भेटला. चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितलं की, त्यांच्या पक्षात 35 टक्के खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 30-35 टक्के काँग्रेसमधून आलेले आहेत. मग यांच्या पक्षात 70-80 टक्के नेते आमच्याकडून आले असतील, तर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'काँग्रेसमुक्त भारत'च्या घोषणेचं काय झालं?, " असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. 

...

पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल

हिंजवडीसारख्या औद्योगिक केंद्रात 6 लाख रोजगार असूनही, सरकारच्या नाकर्तेपणामुळं नव्या गुंतवणुकी बाहेरच्या राज्यांत जात आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
[News18 Lokmat]Dhananjay Munde - Chhagan Bhujbal य...
[Navshakti]उद्योगविश्वातील 'दादागिरी'वरून टीकास्त्...