बापू : देशाचा आत्मा

बापू : देशाचा आत्मा

आपल्या बारामती मतदारसंघात गावभेटींदरम्यान असताना त्या गावांच्या इतिहासाबद्दलही जाणून घेत असते. यामुळे त्या गावातील सांस्कृतिक मातीचा पोत पटकन लक्षात येतो आणि तिथल्या वातावरणाशी कनेक्ट करणं अधिक सोपं जातं. मी जेंव्हा खडकवासला येथे जाते तेंव्हा तेथील ग्रामपंचायतीजवळच्या तिठ्यावर एका वीजेच्या खांबाला लटकाविलेल्या पाटीकडे माझं आवर्जून लक्ष जातं. त्या पाटीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खडकवासला येथील आगमनाची तारीख आणि वेळ आवर्जून नोंद केलेली आहे. जवळपास अर्ध्या शतकानंतरही तेथील गावकऱ्यांनी गांधींजींच्या पाऊलखुणा जतन करुन ठेवल्या आहेत. आपल्या मतदारसंघातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं तरी त्यांच्या अस्तित्त्वाची आवर्जून जाणीव होते. या जाणिवेने देशाचा इतिहास, वर्तमान उजळून तर गेला आहेच शिवाय त्यांना टाळून भविष्याची देखील कल्पना करणे अशक्य आहे. गांधीजींनी समाजकारणाला अध्यात्माची जोड देऊन त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. हे अध्यात्मिक बंध समाजातील शेवटच्या माणसाला देखील बांधून ठेवणारे होते. एकाच वेळी कोट्यवधी माणसे एकाच ध्येयाने प्रेरीत होऊन स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी सज्ज झाली होती. या चळवळीचा रेटा एवढा मोठा होता की, ज्या साम्राज्यावर सूर्य मावळला जात नाही त्या ब्रिटीश सत्तेला या देशातून परत जावे लागले. एवढा मोठा लढा आणि व्यापक चळवळ उभारणाऱ्या या जगावेगळ्या माणसाबद्दल महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणाले होते, की ‘भावी पिढ्यांना विश्वास बसणार नाही, की हाडामासाचा कुणी माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला’. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला- ज्यानं आण्विक उर्जेचा भला मोठा स्रोत मानवजातीसाठी खुला केला, ज्याने हिटलर सारख्या हुकूमशहाला देखील जुमानले नाही, ज्याचा बुद्धीगुणांक आजही जगातला सर्वोत्तम मानला जातो; त्याला देखील भुरळ पाडणारा हा अर्ध्या कपड्यांतला फकीर केवळ भारतच नाही तर जगातल्या स्वातंत्र्य चळवळींचा ‘आयकॉन’ बनला. ‘लोकल ते ग्लोबल’ स्वीकार्हता असणाऱ्या गांधींना आजही टाळता येत नाही. ते आजही तेंव्हाइतकेच कालसुसंगत आहेत. एवढ्या मोठ्या स्वातंत्र्यलढ्याचा नायक स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले असताना कुठे होता याचा शोध घेतला तरी या माणसाचे वेगळेपण लक्षात येऊ शकेल. दिल्लीत स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा होत असताना, देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु त्यांचे प्रसिद्ध ‘नियतीशी करार’ हे भाषण करीत असताना गांधीजी मात्र बंगालमधील नौआखली येथे उसळलेली दंगल शमविण्यासाठी जीवाचे रान करीत होते. तेथे झालेल्या हत्यांमुळे ते व्यथित झाले होते. नौआखलीत ठिकठिकाणी पदयात्रा काढून गांधींनी वांशिक विद्वेषाने धुमसणारा तो भाग शांत करण्याचा प्रयत्न केला. पुढे दिल्लीत परतल्यानंतर देखील त्यांनी शांततेचे प्रयत्न सुरु केले. परंतु मनुवादी विचारांनी पछाडलेल्या संघटनांनी नथुराम गोडसे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गांधींची हत्या घडवून आणली. ज्या देशात गांधींनी स्वातंत्र्य, शांतता, सौख्य आणि एकतेसाठी आयुष्य वेचले त्याच देशात आज गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेवादी प्रवृत्तींचा उघडपणे उदो-उदो केला जातो, हे क्लेशदायक आहे. या प्रवृत्तींनी कितीही प्रयत्न केला तरी गांधी मात्र कधीही मरणार नाही, कारण गांधी हा देशाचा आत्मा आहे , सर्वसामान्य माणसांच्या हिताचा विचार आहे आणि सतत सत्याचा शोध आहे. त्याला 'मरण' नाही.

Read More
  124 Hits