महाराष्ट्र

माझे बाबा

( दै. लोकसत्ता या वर्तमानपत्रातील 'चतुरंग' या पुरवणीत दि. २६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेला हा लेख https://www.loksatta.com/chaturang-news/supriya-sule-article-on-father-sharad-pawar-1829968/ ) दिल्लीतल्या घरात सकाळी जेंव्हा जाग येते, तेंव्हा बाबा मला पेपरांची भलीमोठी चळत घेऊन त्यातील एक एक पेपर काळजीपूर्वक वाचत बसलेले दिसतात... ही त्यांची सवय आजची नाही. त्यांचं जे पहिलं दर्शन माझ्या मन आणि मेंदूवर कोरलं आहे ते असंच.... मी जेंव्हा खुप लहान होते तेव्हा आणि नंतर अगदी शाळा कॉलेजात जाऊ लागले आणि अगदी आत्ता सुद्धा जेंव्हा आम्ही दोघेही संसदेच्या अधिवेशनानिमित्त किंवा काही बैठकांनिमित्त दिल्लीतील आमच्या घरी असतो, तेंव्हा शेजारी दहा-पंधरा वर्तमानपत्रांची चळत घेऊन बाबा अगदी सक्काळी-सक्काळी पेपर वाचत असतात ! भवतालचं आकलन करुन घेण्याची त्यांची ही तीव्र भूक मी अगदी लहानपणापासून अनुभवत आले आहे. नवं ते जाणून घेण्याची आणि जुन्यामध्ये भर टाकण्याची त्यांची जिज्ञासा पुर्वीइतकीच आजही तीव्र आहे. नव्या जमान्याशी जुळवून घेण्यासाठी कंप्युटर असो की स्मार्टफोन, बाबांनी आवर्जून आपल्याला हवं ते शिकून घेतलं आहे, ते या जिज्ञासेपोटीच. बाबांच्या बाबतीत लिहायचं म्हटलं तर नेमकं काय लिहायचं हा प्रश्न माझ्यासमोर फेर धरतो. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनीही जेंव्हा मला बाबांसंदर्भात लिहायला सांगितलं तेंव्हा नेमकं काय लिहायचं असा प्रश्न पडला. कारण माझ्या आणि बाबांच्या नात्यात, संबंधात कोणत्याही बाप आणि मुलीमध्ये असलेल्या नात्यापेक्षा वेगळं काही आहे, असं मला कधी वाटतच नाही. बाबा त्यांच्या राजकीय कारकीर्दीत मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री अशा शिड्या चढत गेले. पण माझ्यासाठी इतर मुलांना जसं आपल्या वडिलांचं नोकरीतलं प्रमोशन असतं, तसंच वाटत राहिलं. याचं कारण म्हणजे या पदांचं जे वलय त्यांच्याभोवती राहिलं त्यापासून त्यांनी आम्हाला अलिप्त ठेवलं. माझ्या शाळेत त्यांनी माझ्या बहुतेक सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. इतर पालकांप्रमाणे ते रांगेत उभा राहिले आहे. बाहेरच्या जगासाठी ते मुख्यमंत्री वगैरे असले तरी जेंव्हा ते माझ्यासाठी शाळेत येत असत तेंव्हा ते केवळ 'सुप्रियाचे बाबा’ असत. कोणत्याही बाप-लेकीचं नातं म्हणजे जणू दूधामध्ये साखर विरघळावी आणि ते गोड व्हावं तसं असतं. ही प्रक्रीया जशी सोपी आणि सहज आहे अगदी तसंच आम्हा मायलेकरांच नातं सहज आणि मधूर आहे. त्यात वेगळं असं काहीच नाही, आणि तसं नसेल तर सांगायचं काय असा प्रश्न मला नेहमी पडतो.बाबा देशातले ज्येष्ठ नेते, केंद्रात अनेकवेळा मंत्री, महाराष्ट्रात अनेकवेळा, अनेकवर्ष मंत्री, मुख्यमंत्री, सलग अर्ध्या शतकांहून अधिक काळ देशातल्या सर्व सभागृहांत अखंड संसदीय कारकीर्द असलेले नेते, कार्यक्षम-प्रशासनकुशल, जबरदस्त मेहनती आणि आकलन असलेला राज्यकर्ता, राजकारणाएवढंच क्रीडा, संस्कृती, साहित्य क्षेत्रातही लीलया वावर, त्यातल्या सगळ्याच बाबींची उत्तम जाण- अशी खूप मोठी विशेषणं लागतात त्यांना. पण, ते जेव्हां माझे बाबा असतात, तेव्हां ते फक्त ‘माझे बाबा’च असतात. यातल्या कुठल्याच विशेषणाची प्रभावळ त्यांच्यामागे नसते. त्यांच्या एवढ्या थोर व्यक्तीमत्त्वाचं ओझं आमच्या नात्यावर अजिबातच नसतं. कोणताही बाप आपल्या मुलीचे जसे लाड करतो, तसे माझे लाड झाले आहेत, वेळोवेळी त्यांनी माझ्यासाठी वेळ दिलेला आहे (अगदी नातवंडांनाही आजोबा जेंव्हा हवे तेव्हां मिळत असतात!). माझ्या सर्व मित्र-मैत्रिणी त्यांना चांगल्या माहित आहेत, त्यांच्या विचारांनुसार त्यांनी माझ्या वाढीला, मला माझ्या आवडीची क्षेत्रं निवडायला, त्यात मुक्तपणे वावरायला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे... आमचे मतभेदही आम्ही मांडले आहेत, भरपूर एकत्र फिरलो आहोत, हसलो-खिदळलो आहोत. कोणत्याही बाप आणि मुलीच्या नात्यात हेच असतं ना? यापेक्षा वेगळं काय असतं? त्यामुळे, आज आम्ही दोघेही सार्वजनिक जीवनात असलो, बाबांना त्यांची स्वत:ची खूप मोठी ओळख, मानसन्मान असला, तरी आमच्या दोघांच्या नात्यांमध्ये ते माझे ‘बाबा’ आहेत आणि मी त्यांची ‘मुलगी’ आहे. अर्थात, हे नातं असं केवळ दोन व्यक्तींमधलं नाही, हेही मला आवर्जून सांगितलं पाहिजे. आमचं नातं द्विमित नसून त्रिमित आहे. या नात्यातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि भक्कम कोन आहे, तो माझ्या आईचा. माझ्या आईशिवाय आमचं बाप आणि मुलीचं नातं पूर्ण होऊ शकत नाही. किंबहुना तिच्या प्रभावानेच ते इतकं छान जमलं आहे. आम्ही तिघेही परस्परांशी खूप घट्ट बांधलेले आहोत. कुणालाही हे सांगून खरं वाटणार नाही पण बाबांना साड्यांची अतिशय चांगली पारख आहे. साड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांत ते गेले तर तेथून घरातल्या प्रत्येकीसाठी अतिशय सुंदर साड्या आणतात. बाबांना देशातील उत्तम साड्या विकणारी बहुतेक सर्व दुकानं माहित आहे. साड्यांचे कापड, त्यांचे रंग, बांधणी, त्यावरची डिझाईन यांचं फ्युजन उत्तम जमलं तर ती साडी उत्तम असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांची कपड्यांबाबतची निवड इतकी पक्की असते की, त्यावर मनात आणलं तरी नापसंतीची मोहोर उमटवणं अशक्य असतं. आईच्या नव्वद टक्के साड्या बाबांनीच आणलेल्या आहेत. एखादे वेळेस आम्ही स्वतःहून आणलेली एखादी साडी मी किंवा आईने घातलेली असेल, आणि जर ती त्यांना आवडली नाही तर ‘ही असली साडी...

Read More
  398 Hits