माझे बाबा
( दै. लोकसत्ता या वर्तमानपत्रातील 'चतुरंग' या पुरवणीत दि. २६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेला हा लेख
https://www.loksatta.com/chaturang-news/supriya-sule-article-on-father-sharad-pawar-1829968/ )
दिल्लीतल्या घरात सकाळी जेंव्हा जाग येते, तेंव्हा बाबा मला पेपरांची भलीमोठी चळत घेऊन त्यातील एक एक पेपर काळजीपूर्वक वाचत बसलेले दिसतात... ही त्यांची सवय आजची नाही. त्यांचं जे पहिलं दर्शन माझ्या मन आणि मेंदूवर कोरलं आहे ते असंच.... मी जेंव्हा खुप लहान होते तेव्हा आणि नंतर अगदी शाळा कॉलेजात जाऊ लागले आणि अगदी आत्ता सुद्धा जेंव्हा आम्ही दोघेही संसदेच्या अधिवेशनानिमित्त किंवा काही बैठकांनिमित्त दिल्लीतील आमच्या घरी असतो, तेंव्हा शेजारी दहा-पंधरा वर्तमानपत्रांची चळत घेऊन बाबा अगदी सक्काळी-सक्काळी पेपर वाचत असतात ! भवतालचं आकलन करुन घेण्याची त्यांची ही तीव्र भूक मी अगदी लहानपणापासून अनुभवत आले आहे. नवं ते जाणून घेण्याची आणि जुन्यामध्ये भर टाकण्याची त्यांची जिज्ञासा पुर्वीइतकीच आजही तीव्र आहे. नव्या जमान्याशी जुळवून घेण्यासाठी कंप्युटर असो की स्मार्टफोन, बाबांनी आवर्जून आपल्याला हवं ते शिकून घेतलं आहे, ते या जिज्ञासेपोटीच.
बाबांच्या बाबतीत लिहायचं म्हटलं तर नेमकं काय लिहायचं हा प्रश्न माझ्यासमोर फेर धरतो. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनीही जेंव्हा मला बाबांसंदर्भात लिहायला सांगितलं तेंव्हा नेमकं काय लिहायचं असा प्रश्न पडला. कारण माझ्या आणि बाबांच्या नात्यात, संबंधात कोणत्याही बाप आणि मुलीमध्ये असलेल्या नात्यापेक्षा वेगळं काही आहे, असं मला कधी वाटतच नाही. बाबा त्यांच्या राजकीय कारकीर्दीत मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री अशा शिड्या चढत गेले. पण माझ्यासाठी इतर मुलांना जसं आपल्या वडिलांचं नोकरीतलं प्रमोशन असतं, तसंच वाटत राहिलं. याचं कारण म्हणजे या पदांचं जे वलय त्यांच्याभोवती राहिलं त्यापासून त्यांनी आम्हाला अलिप्त ठेवलं. माझ्या शाळेत त्यांनी माझ्या बहुतेक सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. इतर पालकांप्रमाणे ते रांगेत उभा राहिले आहे. बाहेरच्या जगासाठी ते मुख्यमंत्री वगैरे असले तरी जेंव्हा ते माझ्यासाठी शाळेत येत असत तेंव्हा ते केवळ 'सुप्रियाचे बाबा’ असत. कोणत्याही बाप-लेकीचं नातं म्हणजे जणू दूधामध्ये साखर विरघळावी आणि ते गोड व्हावं तसं असतं. ही प्रक्रीया जशी सोपी आणि सहज आहे अगदी तसंच आम्हा मायलेकरांच नातं सहज आणि मधूर आहे. त्यात वेगळं असं काहीच नाही, आणि तसं नसेल तर सांगायचं काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. बाबा देशातले ज्येष्ठ नेते, केंद्रात अनेकवेळा मंत्री, महाराष्ट्रात अनेकवेळा, अनेकवर्ष मंत्री, मुख्यमंत्री, सलग अर्ध्या शतकांहून अधिक काळ देशातल्या सर्व सभागृहांत अखंड संसदीय कारकीर्द असलेले नेते, कार्यक्षम-प्रशासनकुशल, जबरदस्त मेहनती आणि आकलन असलेला राज्यकर्ता, राजकारणाएवढंच क्रीडा, संस्कृती, साहित्य क्षेत्रातही लीलया वावर, त्यातल्या सगळ्याच बाबींची उत्तम जाण- अशी खूप मोठी विशेषणं लागतात त्यांना. पण, ते जेव्हां माझे बाबा असतात, तेव्हां ते फक्त ‘माझे बाबा’च असतात. यातल्या कुठल्याच विशेषणाची प्रभावळ त्यांच्यामागे नसते. त्यांच्या एवढ्या थोर व्यक्तीमत्त्वाचं ओझं आमच्या नात्यावर अजिबातच नसतं. कोणताही बाप आपल्या मुलीचे जसे लाड करतो, तसे माझे लाड झाले आहेत, वेळोवेळी त्यांनी माझ्यासाठी वेळ दिलेला आहे (अगदी नातवंडांनाही आजोबा जेंव्हा हवे तेव्हां मिळत असतात!). माझ्या सर्व मित्र-मैत्रिणी त्यांना चांगल्या माहित आहेत, त्यांच्या विचारांनुसार त्यांनी माझ्या वाढीला, मला माझ्या आवडीची क्षेत्रं निवडायला, त्यात मुक्तपणे वावरायला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे... आमचे मतभेदही आम्ही मांडले आहेत, भरपूर एकत्र फिरलो आहोत, हसलो-खिदळलो आहोत. कोणत्याही बाप आणि मुलीच्या नात्यात हेच असतं ना? यापेक्षा वेगळं काय असतं? त्यामुळे, आज आम्ही दोघेही सार्वजनिक जीवनात असलो, बाबांना त्यांची स्वत:ची खूप मोठी ओळख, मानसन्मान असला, तरी आमच्या दोघांच्या नात्यांमध्ये ते माझे ‘बाबा’ आहेत आणि मी त्यांची ‘मुलगी’ आहे.
बाबा म्हणाले, की आपण विजयच्या ( माझा मुलगा) बायकोसाठी आणखी एक शाल घेऊन ठेवू... त्याची ही आयडीया रेवतीनं हाणून पाडली. विजय आता सतरा वर्षांचा आहे केवळ, पण तरीही त्याच्या भावी पत्नीसाठी देखील शाल खरेदी करायला निघाले होते बाबा... बाबा आमच्यासाठी कपडे खरेदी करतात ते असे. आजही त्यांच्या नातवंडाच्या बर्थडे गिफ्ट बाबा स्वतः निवडतात. दुसऱ्यांना नावे ठेवलेलं किंवा त्याच्याबद्दल विनाकारण गॉसिप केलेलं बाबांना अजिबात आवडत नाही. कधीकधी आई आणि मला असं गॉसिप करण्याचा मोह आवरत नाही. हे गॉसिप ऐकलं की बाबा आम्हाला रागावतात. तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलताय म्हणजे तुम्हाला कमी कामं आहेत. तुमची कामं वाढवायची का ? असं ते म्हणतात. त्यांचं हे रागावणं ऐकलं की आम्ही दोघीही गप्प बसतो. ते थोड्या वेळाने बाहेर गेले की आमचं आपलं पुन्हा सुरु होतं. आपला वेळ चांगल्या कामासाठी सार्थकी लावावा. कोणत्याही व्यक्तीबद्दल चुकीचं बोलू नये असं त्यांचं मत असतं. ते बरोबरही आहे.
आमचं पवार कुटुंब किती मोठं आहे आणि आजही ते कसं एकत्र आहे, हे सर्वांनाच माहित आहे. अशा एकत्र कुटुंबातल्या सर्व भूमिका निभावत माझ्या आई-बाबांनी त्यात पुन: आमचं तिघांचं असं एक घट्ट कुटुंब विणलं आहे. एखाद्या कपड्यावर रंगबिरंगी धाग्याची सुबक वीण असावी तसं आमचं हे कुटुंब....जसं आई पवार कुटुंबाशी एकरुप झाली तसंच माझे बाबाही शिंदे कुटुंबाशी एकरुप झाले आहेत. माझे कोल्हापूरचे काका सध्या हयात नाहीत. त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी माझे आई-बाबा दोघेही वरमाई-वरबाप म्हणून तीन दिवस कोल्हापूरात मुक्काम ठोकून होते. बाबांनी नाती अशी जपली आहेत. माझ्या आई-बाबांची मी लाडकी आहे, असं आमच्या बहुतेक परिचितांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं, असायलाच हवी. एकुलती एक लेक! त्या दोघांना मी कधी कधी चिडवतेही, ‘नाईलाजच आहे तुमचा. नाही लाड कराल माझे तर काय कराल? पर्यायच नाही तुम्हाला दुसरा!’ माझी आजी प्रगत विचारांची होती. कोणत्याही मताचा स्वीकार करीत असताना ती काळाच्या कसोटीवर तपासून पाहण्याची तिची वृत्ती होती. आजीचे हेच गुण माझ्या बाबांमध्ये उतरले आहेत. आमच्या घरात कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव झाला नाही. घरातली लेक असो की सुन सर्वांना समान स्थान आहे. ज्या काळात ‘मुलगा हाच वंशाचा दिवा’ वगैरे समजूती घट्ट होत्या, त्या काळात त्यांनी एका मुलीवर आपला कुटुंबविस्तार थांबवला. आपल्या विचारांवर ते नेहमीच कायम राहिलेले आहेत. माझ्या जन्मावेळी त्यांच्या मनात जो भाव होता, तोच मला वाढवतानाही होता. मी मुलगी आहे, त्यामुळे काही गोष्टी करायच्या नाहीत, किंवा वेगळ्या प्रकारच्या वागणूकीची सवय लहानपणापासूनच करायची, असं त्यांनी कधी केलं नाही. स्त्रियांना समानतेची वागणूक, विकासाची समान संधी देण्याबाबत जे ते बाहेर बोलत आले, त्याचं तंतोतंत पालन त्यांनी घरात केलं. त्यामुळे, ‘मुलगी’ म्हणून माझ्यावर उगीच नको ती बंधनं आली नाहीत. जे स्वातंत्र्य घरात दादाला मिळालं, तेच मलाही मिळालं. पुन: मी वाढले मुंबईतच, हे शहर सर्वांना कवेत घेणारं, सारखी वागणूक देणारं आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरण्यासाठी जो आत्मविश्वास, जे भान आणि जी सहजता असावी लागते, ती मला या शहरात आणि घरातून आपसूकच मिळालं, असं मला वाटतं. बाबा मुख्यमंत्री असताना देखील मी बेस्टच्या बसमधून प्रवास करीत असे. अगदी ‘रामटेक’ असो किंवा ‘वर्षा’, बाबा पदावर असताना देखील इतरांच्या घरांची फाटकं जशी खुली असतात अगदी तशीच या दोन्ही बंगल्यांची दारं सर्वांना खुली असायची. आजच्याइतका सेक्युरिटीचा तामझाम नव्हता. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या चिरेबंदी भिंतीत आमचं आयुष्य चिणलं गेलं नाही. उलट हे आपलं घर नाही, आपल्या नोकरीसोबत ते आपल्याला लाभलेलं आहे. एक दिवस ते आपल्याला सोडावं लागणार आहे, याची जाणिव ते करुन देत, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं.
मला आठवतंय, मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा एकटीने प्रवास केला, तो मी ५ वर्षांची असताना. दिल्लीला अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक असावी. विमानतळावरून थेट मला एका परिचितांच्या घरी नेलं, त्यांना म्हणाले, ‘मला महत्त्वाची मिटींग आहे. तोपर्यंत मी हिला इथे ठेवतो. तिला सांभाळा’, अन् बैठकीला निघून गेले. दोन-तीन तासांनी बैठक संपली असावी. तिथून ते मला घ्यायला आले आणि मला घेऊन मग दिल्लीत फिरवलं, मला आवडायचं ते खाऊपिऊ घातलं आणि मग आम्ही मुंबईत परतलो. आपल्या कामाच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातूनही ते असा छान वेळ काढायचे. रेवतीच्या जन्मावेळी मी जेव्हां हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, तेव्हांही ते दिल्लीत होते. माझी प्रसूती झाल्याचं समजताच सकाळी ६ च्या विमानाने ते मुंबईत आले. विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी माझी विचारपूस केली, रेवतीला उचलून घेतलं, आपल्या लेकीच्या लेकीला पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर जणू त्यांच्या लेकीचं बालपण पुन्हा एकदा गवसल्याचे भाव होते.त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा तो भाव मी अजूनही विसरु शकत नाही. बाबा त्यानंतर तास-दोन तास रुग्णालयात थांबले आणि तिथूनच थेट विमानतळावर जाऊन दिल्लीला पोहोचले. ज्या बैठकीसाठी म्हणून ते दिल्लीला गेले होते, त्या बैठकीला ते वेळेवर पोहोचले देखील! रेवतीला बाबा अंमळ जरा जास्तच जीव लावतात. अगदी राज्यसभेसाठी मी अर्ज दाखल करायला गेले, तेंव्हा ती बाबांच्या कडेवर होती. आजोबांनी नातवंडांसाठी जसा वेळ द्यायला हवा अगदी तस्साच बाबांनी त्यांना दिला आहे. आता तर बाबा, रेवती आणि आई असं त्यांचं एक वेगळं युनिट आमच्या घरात तयार झालंय. एखाद्या मुद्यांवरुन मी बाबांसोबत वाद घालत असले की, माझ्यामागून रेवती त्यांना खुणावते, की तुम्ही तिचं ऐकू नका. तुम्हाला हवं तेच करा. बाबा पण तिला अनुमोदन देतात. या दोघांचं इकडं संगनमत झाल्याचं लक्षात येताच मी शांत बसते. मी दौऱ्यावरुन घरी परत आले की, रेवती-बाबा आणि आई यांचं एक वेगळं जग तयार झालेलं असतं. त्यावेळी वाटतं, की अरे मी चुकून वेगळ्याच जगात आलेय. माझे बाबा नातवंडांच्या जगात असे छान रमतात. आणि नातवंडंही आपल्या प्रेमळ आजोबाच्या संगतीत आई-वडीलांनाही विसरुन जातात. सुखाची यापेक्षा वेगळी व्याख्या काय असते ?
राजकारणातला त्यांचा वावर, त्यांची त्यातली हातोटी यामुळे अनेकांना ते कठोरहृदयी असावेत, असं वाटतं. पण, प्रत्यक्षात ते तसे नाहीत. सार्वजनिक ठिकाणी आपल्या भावनांचं प्रदर्शन केलेलं त्यांना आवडत नाही. मोठ्या संयमाने ते त्यावर ताबा ठेवतात. अर्थात, त्यालाही कधीतरी अपवाद होतोच. यशवंतराव चव्हाण साहेब गेले, त्यावेळी त्यांना ही गोष्ट साधली नव्हती, हे मी स्वत: बघितलं आहे. माझं लग्न झालं, त्यावेळीही ते खूप अस्वस्थ होते, असं माझी आई सांगते. राजकारण्यांचा हळवेपणा राजकारणात करपतो. प्रदर्शन करत नसले, तरी बाबांचा हळवेपणा मला खूपदा दिसला आहे, जाणवला आहे. माझं लग्न झाल्यावर मी अमेरिकेला गेले. तिथं पहिले काही दिवस मला मुळीच करमत नसे. मी तिथून आई-बाबांना जेंव्हा फोन करायचे तेंव्हा मला आपोआप रडायला यायचं. एक दिवस बाबा मला म्हणाले, की तू फोनवर रडत जाऊ नकोस, कारण तुझं रडणं ऐकलं की मला येथे रात्रभर झोप लागत नाही. परदेशात राहणाऱ्या मुलीच्या आठवणीने असे व्याकुळ होणारे बाबा मी त्यावेळी प्रथमच अनुभवले होते. त्यानंतर आज जवळपास अडीच दशके उलटून गेली त्यानंतर मी बाबांना फोन करुन अशा प्रकारे तक्रार केलेली नाही. अर्थात हे असं प्रत्येकाच्या घरात असतंच. मी काही आत्ता लहान नाही. दोन मोठ्या मुलांची आई आहे. तिसऱ्यांदा खासदार आहे. पण, मी मुंबईत किंवा दिल्लीत एकटी बाहेर पडते, तेव्हां ते मी परतेपर्यंत काळजी करत असतात. गंमत म्हणजे, हेच जेव्हां मी महाराष्ट्रभर दौरे करते, रात्री-बेरात्री घरी पोहोचते, किंवा विमान पकडण्यासाठी भल्या पहाटेच निघते, जिल्ह्याजिल्ह्यांतून, खेड्यापाड्यांतून फिरत असते, तेव्हां मात्र त्यांना ही काळजी नसते. पण, दिल्लीत माझ्या खासदार मैत्रिणी किंवा अगदी केंद्रात मंत्री असलेल्या मैत्रिणींबरोबर मी बाहेर पडते, तेव्हां मात्र ते आमच्याकडे गाडी-ड्रायव्हर आहे का, पुरेसे पैसे बरोबर आहेत का, आम्ही कुठे जाणार आहोत, अशी चौकशी करत असतात. त्यांच्या या काळजी घेण्याचं आम्हाला सगळ्यांनाच हसू येतं. पण, मला वाटतं, एकतर आपण कितीही मोठे झालो, तरी आपल्या पालकांसाठी आपण लहानच असतो, याचा तो भाग असावा किंवा आपल्या मुलीसाठी कोणत्याही बापाचं मन किती हळवं असतं, हेच यातून दिसत असावं.
आईवडिलांच्या आपल्या मुलाकडून काहीना काही अपेक्षा असतात. पण, गंमत म्हणजे, माझ्या बाबांनी माझ्याकडून कधीच अशा काही अपेक्षा व्यक्त केल्या नाहीत. त्यामुळे, आईवडिलांच्या अपेक्षांचं ओझं वगैरे माझ्यावर काही नव्हतं. अनेक आईवडील आपल्या स्वप्नांची, अपेक्षांची पूर्ती मुलांकडून करून घेण्यासाठी त्यांना त्या दिशेने ढकलताना दिसतात. माझ्याबाबतीत ते कधीच झालं नाही. त्याची दुसरी बाजू अशी, की त्यांच्याकडून माझं कधी भरभरून कौतुक झालं असंही नाही. गेल्या पन्नास वर्षांत कोणत्याही एखाद्या गोष्टीसाठी त्यांनी माझं खूप कौतुक केल्याचं मला आठवत नाही. अगदी परवा-परवा माझ्या भाषणाचं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कौतुक केलं. पण बाबांनी त्यावर कसलीही प्रतिक्रीया दिली नाही. ते जेव्हां एखादी चूक काढत नाहीत, सुधारणेच्या दृष्टीने शांतपणे काही सांगत नाहीत, तेव्हां तेच कौतुक समजायचं असतं! मी तर कधीकधी त्यांच्यावर वैतागते. ‘असे कसे तुम्ही आई-बाबा? कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा कशी नाही तुम्हाला माझ्याकडून? कुठल्या गोष्टीसाठी लहानपणी प्रोत्साहनही कसं दिलं नाहीत तुम्ही?’ आजही त्या दोघांचीही भूमिका तीच आहे. माझं राजकारण- त्यातली माझी वाटचाल याबाबत त्यांना निश्चित अशी काही अपेक्षा, त्यांनी माझ्यासमोर काही ध्येय ठेवलंय वगैरे असं काही नाही. त्यामुळे, नाही एखादी गोष्ट जमली, किंवा मला साधता आली, तर ओरडा खाण्याचा वगैरे प्रसंग कधी आलेला नाही. ते माझ्यावर खूप रागावलेत किंवा मी त्यांच्या खूप मनाविरुद्ध वागले आहे, असंही त्यांनी कधी जाणवू दिलेलं नाही. मी माझ्या मुलावेळी दुसऱ्यांदा गरोदर राहिले, तेव्हां मात्र ते मला म्हणाले होते, ‘कशाला आणखी मूल पाहिजे तुम्हाला?’ रेवती आहे ना? पहिली मुलगी आहे, म्हणून आम्ही मुलाची प्रतिक्षा करतोय, असं त्यांना वाटलं होतं की काय कुणास ठाऊक? जगातल्या कोणत्याही गोष्टींबाबत त्यांच्या मनात एक कुतुहल असतं. त्यांच्यात जबरदस्त चौकसपणा आहे. कोणतीही गोष्ट मूळातून समजाऊन घ्यायला त्यांना आवडते. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील व्यक्तीला भेटायला कितीही कष्ट घ्यावे लागले, तरी ते घ्यायची त्यांची तयारी असते. अगदी या वयातही लहान मूल होऊन ते ती गोष्ट समजून घेतात. त्यामुळे, त्यांना सर्व क्षेत्रात भरपूर मित्र, स्नेही आहेत. प्रवास आणि मित्रमंडळी हा आमच्या दोघांचाही समान ‘वीक पॉईंट’ आहे. मुंबईतील साहित्यसंघ, शिवाजी मंदीर, बालगंधर्व आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी आम्ही अनेक कलाकारांच्या अभिनयाने नटलेली नाटकं पाहिली आहेत. एकदा आम्ही दोघे गप्पा मारत असताना मी बाबांना म्हणाले की आपण मुंबई-पुण्यात कलाकारांचे कार्यक्रम पाहण्यासाठी-ऐकण्यासाठी आवर्जून जातो. असाच एखादा कार्यक्रम आपण बारामतीत करावा का ? बाबांना ही कल्पना खुप आवडली आणि त्यांनी ती तातडीने अंमलात आणायला सांगितली देखील. त्या कल्पनेचं मूर्त रुप म्हणजे बारामतीमध्ये भरणारा शारदोत्सव... देशविदेशातील कलाकार तेथे आपली कला सादर करण्यासाठी आवर्जून येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला स्वतः बाबा येतात ते केवळ एक कलारसिक म्हणून... दिल्लीतल्या आपल्या वास्तव्यात बाबा दरवर्षी एखाद्या नामांकीत कलाकाराला आपली कला सादर करण्यासाठी बोलावतात. अलिकडे हे थोडं विस्कळीत झालंय.
नुकताच मी ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा पाहिला. तो पाहताना मला सारखं वाटत होतं, या सिनेमात जी पात्रं आहेत, ती माणसं मी लहानपणासून माझ्या घरात वावरताना पाहत आले. साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक, चित्र-शिल्पकला, क्रीडा... अशा जीवनाच्या संपन्न क्षेत्रातील असंख्य माणसं बाबांमुळे माझ्या घरातच मला भेटली आहेत. आणि तीही अगदी घरच्यासारखी! पु. ल. देशपांडे, बापू काळदाते, भीमसेन जोशी, डॉ. रवी बापट... अशी कितीतरी. आजही त्यांचा नवे कार्यक्रम, नवी नाटकं, सिनेमा पाहण्याचा उत्साह कमी झालेला नाही. नवी पुस्तकं, वर्तमानपत्रात आलेले महत्त्वाचे लेख, बातम्या आजही ते बारकाईने वाचतात, त्यावर आमची चर्चाही होते. महेश काळे- राहूल देशपांडे यांचं गाणं ऐकायला ते जातात, सिनेमे बघतात, अगदी अलिकडेच ‘देवबाभळी’ हे नाटक आम्ही एकत्र पाहिलं. नवा सिनेमा, नाटक, गाण्याचा कार्यक्रम ते पूर्ण ‘एंन्जॉय’ करतात. त्याला दाद देतात. ‘आमच्यावेळी’ किंवा ‘तो काळच वेगळा होता’ वगैरे अशी भाषा त्यांच्या तोंडी कधी नसते. ते काळाबरोबर पुढे जाणारे, पूर्ण वर्तमानात जगणारे आहेत. माझे अनेक मित्र-मैत्रिणी तर त्यामुळे मला चिडवतात, ‘तुझ्यापेक्षा तुझे बाबाच जास्त ‘इंटरेस्टींग’ आहेत!’
बाबांच्या जबरदस्त इच्छाशक्तीने सगळ्यांनाच अचंबित केलं आहे. अनेक क्लिष्ट, जीवावरची दुखणी त्यांनी सहजपणे स्वीकारली, पेलली आणि त्यावर मातही केली. पुन: त्या आजारपणातून बाहेर आल्याचा कुठलाही बाऊ नाही. त्याचं ‘भांडवल’ करणाऱ्या आठवणी ते कधी काढत नाहीत. जे समोर येईल, त्याला सामोरं जायचं, हा त्यांचा खाक्या असतो. त्यामुळे, ते कशानेच डगमगत नाहीत. मी तरी आयुष्यात कधीच त्यांना असहाय्य झाल्याचं पाहिलेलं नाही. उलट, त्यांच्या प्रकृतीची काळजी करणाऱ्या आम्हालाच ते त्याबाबतीत ‘बिन्धास्त’ करत असतात. दिल्लीत असताना एकदा त्यांना असाच हृदयविकाराचा जरासा त्रास झाला. छोटा स्टेंट टाकावा लागला. आई धावत-पळत दिल्लीला पोहोचली. तर, हेच तिला सांगत होते, ‘काही विशेष नव्हतं गं. मी एवढा फिरतो, जाग्रणं करतो, तरी फक्त एकच स्टेंट... तुम्ही उगाच काळजी करता. माझ्यासारखंच खा-प्या. काही त्रास होत नाही बघ!’ मागे त्यांना दिल्लीतील घरात एक छोटा अपघात झाला. त्यामुळे त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रीया करावी लागली. या संपूर्ण काळात बाबांनी कसलीही तक्रार न करता डॉक्टरांना त्यांचं काम करु दिलं. बाबा हे खुप चांगले पेशंट आहेत. त्यामुळे ते रिकव्हर देखील खुप लवकर होतात. राजकारणात आवश्यक असणारे पेशन्स त्यांना ते पेशंट असताना कदाचित असे उपयोगी पडत असावेत.
राजकीय क्षेत्रात बाबांची एक वेगळी इमेज आहे. त्यांच्या मनाचा थांग लागत नाही असं एक परसेप्शन निर्माण करण्यात आलं आहे. मला वाटतं माझे बाबा जे काही करतात ते खुप विचारपुर्वक करतात. राजकीय स्थितीचा त्यांचा अंदाज त्यांना परफेक्ट अंदाज येतो. त्यानुसार ते पावले टाकत असतात. हे झालं राजकारणापुरतं.... पण बोलण्यासारखं काही नसेल तर बाबा तासन् तास शांत बसलेले असतात. आणि त्यांना बोलायचं असेल तर ते अगदी मनसोक्तपणे विविध विषयांवर गप्पा मारत असतात. त्यांचं हे एक त्यांचं वेगळं व्यक्तीमत्त्व आहे. ते रसिक आहेत, नाती जपणारे आहेत, गुणीजनांचा सन्मान करणारे, नाविण्याचा ध्यास असणारे आहेत. खरं तर आपले बाबा हे बहुतेक मुलींसाठी ‘फ्रेंड-फिलॉसॉफर अँड गाईड’ असतात. माझे बाबाही माझ्यासाठी तसे आहेतच. पण, मला वाटतं, त्यापलिकडे ते माझे ‘रोल मॉडेल’ आहेत. माझेच काय, कोणासाठीही ते उत्तम ‘रोल मॉडेल’ आहेत. माझं आणि त्यांचं नातं असं अगदी साधं, कोणत्याही बाप-मुलीसारखं, पण माझ्यासाठी खूप खूप ‘सोशल’ आहे!!
दिल्लीत आम्ही दोघंही ‘बॅचलर’ आयुष्य जगतो. माझी आई आणि माझा नवरा, मुलं हे सगळे मुंबईतच असतात. दिल्लीतलं वातावरणही छान आहे. एका विशिष्ट मर्यादेनंतर राजकारणापलिकडे छान मैत्री होते सगळ्यांची. आमच्या तिथल्या घरचं डायनिंग टेबल हा सध्या माझ्या आणि त्यांच्या मित्रांचा ‘कॉमन मिटींग पॉईंट’ झाला आहे. अक्षरश: धमाल सुरू असते तिथे. किती क्षेत्रातल्या, किती प्रकारच्या गप्पा, चर्चा आणि हसणं खिदळणंसुद्धा. सगळ्यात ते उत्साहाने सामील असतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांच्या बेडरूमचं दार उघडतं, तेव्हां ते मला पुन: माझ्या बालपणासारखेच शेजारी १५-२० वर्तमानपत्रांचा गठ्ठा घेऊन पेपर वाचत बसलेले दिसतात... त्यांची ही भवतालचं आकलन करुन घेण्याची प्रोसेस सुरु असते.