महाराष्ट्र

संविधान जपण्यासाठी संविधान स्तंभ प्रेरणादायी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे संविधान. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान अर्पण केले होते. त्यामुळेच हा आजचा दिन संविधान दिन म्हणून पाळण्यात येतो.संविधानाप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात गेली काही दिवसांपासून आपण सार्वजनिक ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्याचा उपक्रम राबवित आहोत. या स्तंभांवर संविधानाची उद्देशिका सर्वांना दिसेल अशी लावली आहे. आपण सर्व या देशाचे नागरीक आहोत. हे संविधान आपण सर्वांनी मिळून या देशाला अर्पण केले आहे. या देशातील लोकांच्या हितासाठीच हे संविधान कार्यरत राहील अशी स्पष्ट ग्वाही यातून दिली आहे. देशाच्या एकजूटतेचा एवढा अमोघ आणि प्रखर विचार दुसरा तो कोणता असू शकतो ? सर्वसामान्य जनता आणि भावी पिढ्यांना या संविधान स्तंभांच्या माध्यमातून प्रेरणा मिळेल, जेणेकरुन देशकार्यात ते हिरिरीने भाग घेतील. आपली लोकसत्ताक लोकप्रणाली टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. संविधानात नमूद केलेल्या तत्वांची आठवण लोकांच्या सदैव समोर राहील. आपण प्रजासत्ताक आहोत. लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी स्थापन केलेल्या राष्ट्राचे आपण समान भागधारक आहोत. म्हणूनच देशाचे हे संविधान टिकवून ठेवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे;हा अनमोल विचार सर्वदूर पसरण्यास मदत होईल. संविधान राष्ट्राला सादर करण्यापुर्वी संविधानसभेपुढे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानांची ओळख करुन देताना काही मोलाचे विचार मांडले होते. ते म्हणाले होते, की “माझ्या मते,संविधान कितीही चांगले असो,ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो,ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. …केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते, पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे.”या भाषणाच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे संविधान जपण्याची आणि टिकविण्याची जबाबदारी राजकीय पक्षांसह, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यासह सर्वांचीच आहे. गेली सात दशके जगभरात एवढी स्थित्यंतरं होत असताना, भारताच्या बरोबरीनेच स्वतंत्र झालेल्या इतर देशांमध्ये प्रचंड उलथापालथी होत असताना आपला देश मात्र एकसंध राहिला. प्रगतीच्या शिखराकडे पुर्वीपेक्षा जास्त गतीने वाटचाल करु शकला याचे मुख्य कारण आपल्या संविधानाने आपणास दाखविलेला मार्ग आहे. या मार्गावरुन चालताना आपण एक तसूभरही ढळलो नाही, हेच आपल्या आजपर्यंतच्या यशाचे गमक. आपला देश बहुविध परंपरा, भाषा आणि संस्कृतींचा मिलाफ असणारा देश आहे. ही बहुविधता कायम ठेवतानाना एकसंधता राखण्याची मोठी जबाबदारी आपणावर आहे. एकमेकांच्या संस्कृतीचा, परंपरेचा मान राखताना देश म्हणून एकच विचार करण्याचे संस्कार संविधानाने आपणास दिले आहेत. यावरुन संविधान निर्मात्यांनी किती दूरचा विचार केला होता हे आपणास लक्षात येईल. परंतु गेल्या काही वर्षांपासून संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या काही शक्ती प्रबळ झाल्याचे आपणास जाणवते. या शक्ती देशाचे बलस्थान असणाऱ्या संविधानावर थेट हल्ला करुन देशाचा सामाजिक, आर्थिक आणि संघटनात्मक ‘ताना-बाना’ उद्ध्वस्त करण्याचा खटाटोप करीत आहेत. त्यांचे हे उद्योग लोकशाहीला मारक तर आहेच; परंतु त्याचबरोबर सामूहिक विकासाच्या सुत्राला देखील सुसंगत नाहीत. या शक्तींना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम संविधानाचे खरे पाईक असणारे आपण सर्वजण करु यात थोडीही शंका नाही. परंतु यासाठी आपणास संविधानकारांनी संविधानाच्या उद्देशिकेतच लिहिलेल्या प्रत्येक शब्दातून ध्वनीत होणारे संविधानाचे मर्म आपणास समजून घ्यावे लागेल. संविधानाने आपणास समतेचे एक महत्त्वपूर्ण सुत्र दिले आहे. देशातील प्रत्येकजण समान असल्याचे संविधान सांगते. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केल्याप्रमाणे, समाजाच्या प्रत्येक स्तरात समतेचे सुत्र आपण मान्य केले तरच संविधान टिकून राहील. देशातील कायद्याने सज्ञान असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाचा अधिकार आहे. याचाच अर्थ की देशाच्या जडणघडणीत त्याचा समान वाटा आहे. समतेचे तत्त्व अंमलात आणायचे असल्यास सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया निरंतर होत राहिली पाहिजे. तळागाळातील जनताही मुख्य प्रवाहात मोठ्या उत्साहाने सामील झाली पाहिजे. यासाठी जनतेपुढे त्यांना यासाठी प्रेरणा देणारं प्रतिकात्मक स्वरुपात का होईना पण असायला हवं. संविधान स्तंभ हे त्याचे उत्तम उदाहरण ठरले. संविधानस्तंभ जनतेला लोकशाही व्यवस्था आणि आपला देश यांबाबत आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देत राहील, असा मला विश्वास आहे. आपणा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. सुप्रिया सुळे, खासदार

Read More
  332 Hits