[ETV Bharat]पुणे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन
बारामती : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते युगेंद्र पवार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी संविधानाचं रक्षण आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्याचा संदेश देत हातात फलक घेऊन मौन पाळलं.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा देश संविधानानुसार चालतो. समाजात निर्माण झालेली दरी का वाढत आहे, यावर आता आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. सरन्यायाधीश हे लोकशाहीचे सर्वोच्च पद असून, त्यांच्यावर असा हल्ला होणे अत्यंत निंदनीय आणि काळा दिवस म्हणावा लागेल." त्या पुढे म्हणाल्या, "भूषण गवई हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. त्यांच्या बाबतीत झालेली ही घटना देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची अधोगती दर्शवते."
यावेळी माध्यमांशी बोलताना सुळे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि वैयक्तिक दुःखाचा उल्लेख करत सांगितलं, "यंदा अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच काकींचं निधन झालं आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करायची की नाही, यावर कुटुंबात चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यावर पुढील निर्णय घेऊ."
या आंदोलनातून बारामतीतून एकच संदेश देण्यात आला की, संविधान, न्याय आणि लोकशाहीवरील विश्वास अबाधित राहिला पाहिजे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत आहे. असं असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पुण्यातील बालगंधर्व चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर आत्तापर्यंत जे घडलं नाही ते काल घडलं आहे. या देशाचे सरन्याधीश या देशाच्या कायद्याचे प्रमुख असतात. असं असताना काल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जी काही बूट फेक करण्यात आली आहे ती फक्त एकट्या गवई साहेबांवर झालेली नाही तर संविधानावर झालेली आहे. मनुवाद्यांच्याद्वारे आज संविधानावर हल्ला केला जात आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही पुण्यात आंदोलन केलं आहे. आमची मागणी आहे की अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं यावेळी जगताप म्हणाले.

