बारामती शहर - पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील विविध स्थानके आणि गावांमध्ये तसेच लोहमार्गावरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सर्व्हिस रस्ते, प्लॅटफॉर्म दुरुस्ती आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेकडे केली आहेत.
रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पुणे विभागीय प्रबंधक मिलिंद केळुसकर यांना त्यांनी याबाबत पत्र लिहिले असून लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत, असे त्यात म्हटले आहे. नुकतीच त्यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वानी लोहानी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
दौंड रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या नागरीकांचे पुनर्वसन अनेक दिवसांपासून प्रलंबित असून तातडीने त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. याशिवाय सहजपुर, कासुर्डी, यवत, खुटबाव, कडेठाण, पाटस, सोनेवाडी, खुरवाडी, भिरवडे आणि पुढे भिगवण याठिकाणी लोहमार्गावर उड्डाणपूल उभे करावेत. सहजपुर आणि कासुर्डी येथे प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वे स्थानक करण्याची गरज आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
पाटस येथे उड्डाणपुलाची गरज असून रेल्वे विभाग या कामाच्या निविदा काढत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी सुळे यांनी केली. याबरोबरच दौंड येथून बंगळूर आणि राजस्थान दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या दौंड स्थानकावर थांबत नाहीत. त्या याठिकाणी थांबवण्यात याव्यात. बारामती, दौंड, इंदापूर आणि भिगवण येथून या गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र कोटा जाहीर करण्यात यावा, असे सुळे यांनी या पत्रात नमूद केले आहे. या सोबतच बारामती, फलटण आणि लोणंद याठिकाणी नवीन रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन करावयाचे आहे. तो प्रश्न स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर मार्गी लावावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
नीरा-जेजुरी रेल्वे मार्गावर जेजुरी येथे खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. त्यांच्यासाठी जेजुरी येथे भुयारी मार्गाची गरज असून सुकळवाडी येथे मशिदीत प्रार्थना करण्यासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठीही भुयारी मार्ग तयार करण्याची गरज आहे. नीरा रेल्वे स्थानकाजवळ स्थानिक नागरिकांना छोटे व्यवसाय करण्यासाठी भाडे तत्वावर मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी.
जेजुरी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या छताची उंची वाढविण्याबरोबरच नव्या इमारतीची उभारणी करणे, विस्तारित विश्रांती कक्ष उभारणी, प्लॅटफॉर्म वाढविणे, सहजपुर, खामगाव, खुटबाव, कडेठाण, पाटस, आळेगाव, बोरिबेल, मलठण, राजेगाव स्थानकांची उंची वाढविणे, बारामती येथे सर्व्हिस रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, शिरसूफळ, गावडे वस्ती, सोनबा पाटील वस्ती, सर्व्हे क्रमांक 17 या ठिकाणी जोड रस्ता तयार करून देणे आदी कामे प्राधान्याने करण्यात यावीत, असे सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
http://www.esakal.com/pune/get-work-various-stations-pune-daund-railway-soon-140867