2 minutes reading time (367 words)

[Marathi Oneindia]शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार का? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं, वाचा पत्रकार परिषदेतील 5 मुद्दे

शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार का? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं, वाचा पत्रकार परिषदेतील 5 मुद्दे

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक मोठे विधान केले आहे. "पवार साहेबांवर जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अलोट प्रेम असून, त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे ही सर्वांचीच इच्छा आहे. यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना प्रेमाने विनंती केली आहे," असे सुळे यांनी स्पष्ट केले.

१. रुग्णालयातून डिस्चार्ज आणि पुढील तपासणीशरद पवारांना आज पुण्याच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते आता मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबईत त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून रुटीन चेकअप केले जाईल. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २-३ दिवस ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

२. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांशी संवाद

पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी मविआमध्ये चर्चा सुरू झाली आहे. "मी स्वतः शिवसेना (UBT) नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांना विनंती केली आहे की, सर्वांची इच्छा असेल तर साहेबांना सर्वांनी मिळून राज्यसभेवर पाठवूया. गरज पडली तर मी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही बोलेन," असे सुळे म्हणाल्या.

३. मविआ नेत्यांची भेट

उमेदवारीच्या तांत्रिक बाबींसाठी कालच शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली होती. महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांना 'संमतीचा उमेदवार' म्हणून पाठवण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत.

४. शरद पवारांशी अद्याप चर्चा नाही

पवारांच्या उमेदवारीबाबत खुद्द त्यांच्याशी अद्याप सविस्तर चर्चा झालेली नाही. मुंबईत गेल्यावर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे नेते साहेबांशी या विषयावर प्रत्यक्ष संवाद साधतील.

५. कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह

शरद पवार यांनी पुन्हा एकदा संसदेत प्रतिनिधित्व करावे, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. ही केवळ पक्षाची नाही, तर कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी असलेली मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी अधोरेखित केले.

शरद पवारांच्या निवृत्तीची चर्चा का?

शरद पवार यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. वयोमान आणि पक्षातील बदललेली समीकरणे पाहता, पवार साहेब यंदा तरुण चेहऱ्याला संधी देणार की स्वतः पुन्हा संसदेत जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात दोन मतप्रवाह आहेत. तथापि, सुप्रिया सुळे यांच्या विधानावरून असे संकेत मिळत आहेत की, महाविकास आघाडी पवारांना 'संमतीचा उमेदवार' म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते.


...

Sharad pawar rajya sabha election 2026 supriya sule press conference latest marathi news - Oneindia Marathi

Sharad pawar rajya sabha election 2026 supriya sule press conference शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार का? सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं, वाचा पत्रकार परिषदेतील 5 मुद्दे
[TV9 Marathi]'हा देशाचा प्रश्न, त्यामुळे संसदेत चर...
[TV9 Marathi]शरद पवार राज्यसभेवर जाणार की उद्धवसेन...