[Deshdoot]बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार उभा राहणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवारांच्या नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी १० मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार असल्याचे म्हंटले जात आहे, याच मुद्द्यावर आज सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असून त्याकरता निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. तसेच, रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवारांना संधी दिली जाणार आहे. तर, त्यांच्याविरोधात कोण उभे राहणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर सुप्रिया सुळेंना आज विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, "अर्थात ही निवडणूक बिनविरोध होईल. दादा गेल्यानंतर ही पोटनिवडणूक आहे. आपण इतके सुसंस्कृत आहोत. त्यामुळे नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होईल."
आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
तसेच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारी विषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली. तसंच, अजित पवारांकडे असलेल्या खात्यांपैकी काही खातीही सुनेत्रा पवारांकडे आली. तर, बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवारांकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे आता, अजित पवार ज्या मतदारसंघातून आमदार होते, त्या मतदारसंघात म्हणजेच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली तर सुनेत्रा पवार या आमदार म्हणून निवडून येतील.

