वृद्धांना आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी, सुप्रिया सुळे जेटलींच्या भेटीला

आधार कार्डच्या आधारे ओळख पटवण्यात वृद्ध शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना ज्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध शेतकरी यांना पेन्शन काढताना, रेशन खरेदी करताना आधार व्हेरिफिकेशन होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. शेतात वर्षानुवर्षे काम केल्यामुळे अनेकदा वृद्ध शेतकऱ्यांच्या हातावरच्या रेषा झडतात. या बोटांचे ठसे मशीनवर व्यवस्थित घेता येत नाहीत. त्यामुळे मुळात या व्यक्तींना आधार कार्ड बनवण्यातच अडचणी येतात. सध्या मोबाईल सिम कार्डशीही आधार लिंक करण्याचा सरकारचा आदेश आहे. शिवाय पगार, पेन्शन काढताना इतर सरकारी सबसिडी मिळवतानाही आधार कार्डचीच सक्ती आहे. त्यामुळे या लोकांना ही गरजेची कामं करताना अडचणी येत आहेत. रेशनकार्ड खरेदी करतानाही अनेक ठिकाणी पीओएस मशीनवर या लोकांच्या बायोमेट्रिक्सची ओळख नीट पटत नाही. या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी जेटलींकडे केली. शिवाय या व्यक्तींच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, याबाबत स्थायी उपाययोजना करेपर्यंत त्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डशिवाय इतर कागदपत्रांना ग्राह्य धरण्यात यावं, अशीही विनंती त्यांनी केली.  वृद्धांना आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी, सुप्रिया सुळे जेटलींच्या भेटीला 

Read More
  265 Hits