[TV9 Marathi]गॅस तुटवडा असल्याचं सरकार का कबूल करत नाही ? सुप्रिया सुळेंचा रोखठोक सवाल
पश्चिम आशियातील युद्ध, वाढता तणाव, या सर्वांचा जगावरही परिणाम होत असून युद्धाचे भारतातही पडसाड उमटत आहेत. सर्वांत मोठी समस्या लोकांना सहन करावी लागते आहे ती गॅस तुटवड्यामुळे. LPG टंचाईमुळे लोकांचे हाल होत असून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लोकं हवालदिल झाले आहेत. गॅस नसल्याने सिलेंडरसाठी अनेका लोक रांगा लावून उभे आहेत. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे, टंचाई नाहीये, उगाच भीती पसरवण्याचं काम विरोधक करत आहे, विरोधक खोट बोलत आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सरकारला काही रोखठोक प्रश्न विचारले आहेत.
देशभरात LPG अडचणी सुरू आहेत. राज्याकडून दिल्या जाणाऱ्या माहितीत तुटवडा आहे. बारामती, शिरूर मधे मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. मग कमतरता, तुटवडा आहे हे सरकार का कबूल करत नाहीये ? असा थेट सवाल त्यांनी विचारला. एलपीजीची यंत्रणा कोलमडली आहे, संसदेत त्यावर आम्ही चर्चेची मागणी करत आहोत. तुटवडा होत असेल तर सरकारने पुढे येऊन सर्वाना वास्तव काय ते सांगितलं पाहिजे, मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत. काय चाललंय महाराष्ट्रात आणि भारतात ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मी भारत किंवा महाराष्ट्र सरकारवर आरोप करत नाहीये, वास्तव दाखवत्ये. मी माध्यमांचे आभार मानते की त्यांनी दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती दाखवली आहे. आज भारतातला माणूस, गृहिणी अडचणीत आहे. या वास्तवापासू भारत सरकार का लपवतंय हे मला समजत नाहीये. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी जर सगळी चॅनेल्स पाहिली, तर कुठे गॅप्स आहेत ते कळेल.
हाताला गॅस नाही म्हणून अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. बारामतीत कमर्शियल गॅस कुठेही मिळत नाही. सगळ्या MIDC मधे 75 टक्के कामगार कमी केले आहेत कारण तिथे गॅस नाही. बारामती, पुणे, नाशिक, बीड, जळगाव, नागपूरमध्ये ही परिस्थिथी आहे. फक्त राज्यात नव्हे तर भारतातही सगळीकडे हीच परिस्थिती आहेत. रांगा लाऊन गॅस मिळायचा पण आता मिळत नाहीये.डेटा दिसतोय सगळीकडे, तुटवडा तर आहेच ना, कशाची वाट बघतंय महाराष्ट्र आणि भारत सरकार? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकार 4 वाजता बोलतं ते आणि वास्तव यात फरक आहे. लग्नासारख्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत, कितीही डोळे बंद केले तरी हे लपून राहणार नाही. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी बारामतीकरांना गॅस दिला तर मी त्यांचे आभार मानेल. हा राजकीय विषय नाही, सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी सरकारला विनंती आहे. सभागृह सुरू आहे त्यामुळं सरकारने निवेदन करण्याची गरज आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

