फुरसुंगी, उरुळी देवाच्या पाणी योजनेस २४ कोटींचा निधी
पुणे - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत हवेली तालुक्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणी पुरवठा योजनेस राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्यासाठी रुपये २४ कोटी ७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या योजनेसाठी २८ नोव्हेंबर २०१६ च्या शासन निर्णयान्वये ७२ कोटी ८८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यात राज्य शासनाचा वाटा रक्कम रुपये ४७ कोटी सहा लाख आणि पुणे महानगरपालिकेचा वाटा रक्कम रूपये २५ कोटी ८२ लाख इतका होता. परंतु, शासन निर्णयान्वये, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेली प्रशासकीय मंजूरी रद्द करून, या योजनेस राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ७५ कोटी ६५ लाख रुपयांच्या ढोबळ किंमतीस प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. आता या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेमध्ये केंद्र सरकारचा वाटा २४ कोटी ९१लाख रुपये, राज्य सरकारचा वाटा २४ कोटी ९१ लाख रुपये आणि पुणे महानगरपालिकेचा वाटा २५ कोटी ८२ लाख रुपये, असा निश्चित करण्यात आला आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठपुरावा होता.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील आणि अपुर्ण पाणी पुरवठा योजनांची कामे पुर्ण करण्याकरिता, दिनांक ३१ मार्च रोजी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा व या कार्यक्रमांतर्गत फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा (दायित्वासह) समावेश करण्याचा निर्णय ६ जून रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. या योजनेकरिता यापुर्वी झालेला खर्च हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत कायम ठेवून, या योजनेची उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमामधून देणे तसेच निधी वितरीत करण्यास आता मान्यता देण्यात आली आहे.