बारामती लोकसभा मतदार संघात २० ते २८ मार्च दरम्यान शिबिरे पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येत्या मंगळवार पासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजने अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. साठ आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्व तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांना उपयुक्त आधार साधने देण्यात येणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, कानपूर येथील भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा मतदारसंघ निहाय हे शिबीर होणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची अपंगत्व तपासणी करून गरजेनुसार काठी, कुबडी, श्रवणयंत्र, चाकाची खुर्ची अशी आधार साधने देण्यात येणार आहेत. येत्या मंगळवारी (दि. २०) रोजी खडकवासला येथून या शिबिराची सुरुवात होणार असून त्यानंतर हवेली (दि. २१), पुरंदर (दि. २२) बारामती (दि. २३), इंदापूर (दि. २४), दौंड (दि. २५), भोर (दि. २६), वेल्हा (दि. २७) आणि मुळशी (दि, २८) येथे ही शिबिरे होणार आहेत. ही सर्व शिबिरे त्या त्या ठिकाणच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात होणार असून हवेलीचे शिबीर फुरसुंगी येथील आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे.शिबिरात सहभागासाठी खालीलपैकी कोणताही एक दाखला अनिवार्य आहे. गरीबातील गरीब असल्याचा ग्राममसभेचा दाखला १ लाखापेक्षा कमी उपन्न असल्याचा तहसीलदारांचा दाखला प्रधानमन्त्री आवास योजनेचे लाभार्थी असल्याचा दाखला. जिल्हाधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेचा दाखला संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असल्याचा दाखला दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला.