[Saam TV]आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये
अशोक चव्हाण यांचं नाव घेत सुप्रिया सुळे यांची अमित शहा यांच्यावर टीका
आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये आहेत, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. आज अमित शहा पुण्यात होते. पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, असं ते म्हणेल होते. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली.
शरद पवार यांच्यावरील अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, ''शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. अमित शहा ज्या सरकारमध्ये आहेत, त्या मोदी सरकारने पवार साहेब यांना पद्मविभूषण दिलं आहे.
त्या म्हणल्या की, ''त्याचेच एक पदाधिकारी डर्टी डझन म्हणून असे अनेक जण आहेत, असं सांगत होते. आज अमित शहा यांच्या मागे अशोक चव्हाण बसले होते. आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये आहेत, चांगल्या पदावर आहेत, मंत्री आहेत.''.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''अमित शहा यांच्या सहकाऱ्यांनी जितक्या नेत्यांवर टीका केली होती, गेल्या दहा वर्षात ते सगळे नेते भाजपमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत, अमित शहांच्या बरोबर आहेत. अमित शहा यांनी जी टीका केली, ती हास्यास्पद आहे.
सुळे पुढे म्हणाल्या की, ''उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही. त्याचा पक्ष नेला, आमदार नेले, त्यामुळे बोलत आहेत आता असं. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यावर अमित शहा काहीच बोलत नाहीत. आरएसएसने जो शेती मंत्रालय बाबत 118 कोटींचा आरोप केला, यावर सरकारवर काही बोलत नाही.
