[Dainik Prabhat]"त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवारांचा सन्मान केला
शरद पवार यांच्याबद्दल बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यांच्यावर टीका केली जाते. पण अमित शहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार यांना सन्मानित केले आहे. याशिवाय डर्टी डझन ही सिरीज भाजपने सुरू केली आहे. त्यातील 90 टक्के लोकं आज भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहांच्या टीकेला दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या सोबत काम केलेले अशोक चव्हाण हे तर आजच्या मंचावर शहांच्या मागे बसलेले दिसले. त्यांच्यावर याच भाजपने किती तरी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. डर्टी डझनची लिस्ट काढा आणि असे किती नेते महाराष्ट्रातील सांगू, ज्यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसींग ही लाइन धरली होती. त्याच्यामुळे सगळा डेटा काढून तुम्हीच टॅली करा आणि तपासा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी दिले.
मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या की, डेटा दाखवावा आणि त्यांनी सिद्ध करावे. ते म्हणतील तिथे मी चर्चेला बसायला तयार आहे. धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबाबत आमची भूमिका आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दहा वर्षापूर्वी आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस बोलले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. त्या घोषणेचे काय झाले? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
