[My Mahanagar]डर्टी डझन नेते…; अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्यत्तर
पुणे येथील बालेवाडीत भाजपाचे आज, रविवारी (21 जुलै) राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडले. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि मुख्य सरदार असल्याचा आरोप केला. अमित शहांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. डर्टी डझन ही सिरीज भाजपाने सुरू केली. त्यातील डर्टी डझन असणारे नेते आज अमित शहांच्या भाजपात राज्याचे मंत्री आहेत किंवा पदाधिकारी आहेत. (Supriya Sule response to Amit Shah criticism of Sharad Pawar in the BJP state executive session)
अमित शाहांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाली की, शरद पवारबद्दल बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यांच्यावर टीका केली जाते. पण अमित शाहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार यांना सन्मानित केले आहे. याशिवाय डर्टी डझन ही सिरीज भाजपाने सुरू केली आहे. त्यातले 90 टक्के लोकं आज भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री तरी आहेत, नाहीतर पदाधितकारी तरी आहेत. आमच्या सोबत काम केलेले अशोक चव्हाण हे तर आजच्या मंचावर शाहांच्या मागे बसलेले दिसले. त्यांच्यावर याच भाजपने किती तरी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. डर्टी डझनची लिस्ट काढा आणि असे किती नेते महाराष्ट्रातले सांगू, ज्यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसींग ही लाइन धरली होती. त्याच्यामुळे सगळा डेटा काढून तुम्हीच टॅली करा आणि तपासा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी दिले.
मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डेटा दाखवावा आणि त्यांनी सिद्ध करावे. ते म्हणतील तिथे मी चर्चेला बसायला तयार आहे. धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबाबत आमची भूमिका आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दहा वर्षापूर्वी आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस बोलले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. त्या घोषणेचे काय झाले? असा खोचक प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
काय म्हणाले अमित शहा?
भाजपा राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशनात बोलताना शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सरकार म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तोफ डागली. ते म्हणाले की, शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मेरुमणी आहेत. देशात भ्रष्टाचार रुजवण्याचे काम शरद पवार यांनी केले. गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला 1 लाख 91 हजार कोटी रुपये दिले. त्याआधी यूपीएचे सरकार होते आणि शरद पवार मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला काय दिले? असा प्रश्न यावेळी अमित शहा यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधा यासाठी हजारो कोटी रुपये महाराष्ट्राला दिल्याचा दावा यावेळी अमित शहा यांनी केला. ते म्हणाले की, आमचे मुरलीधर मोहोळ पुण्यातील कोणत्याही चौकात उभे राहून मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने काय-काय दिले याचा पै-पैचा हिशेब देतील, तुम्ही काय केले ते सांगा? असे आवाहनही अमित शहांनी शरद पवारांना दिले.
