[Marathi Jagran]अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचावर! 10 जानेवारीला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार
पुणे. Ajit Pawar Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. येत्या १० जानेवारी रोजी हा जाहीरनामा अधिकृतरित्या प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या कार्यक्रमाला अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना पहिल्यांदाच पवार कुटुंबातील बहीण-भाऊ एकाच मंचावर राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा-
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात उभे राहिले होते. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट एकत्र येत संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करत असल्याने, ही केवळ औपचारिक घोषणा नसून राजकीय शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. या निमित्ताने "पवार कुटुंब एकत्र" असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत जाणार असल्याची चर्चा आहे.
जाहीरनाम्यात काय असणार?
संयुक्त जाहीरनाम्यात राज्यातील विकास, शेतकरी प्रश्न, युवक, महिला, रोजगार, महागाई, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी विकास यांसारख्या मुद्द्यांवर ठोस आश्वासने असण्याची शक्यता आहे. विशेषतः मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा जाहीरनामा महत्त्वाचा मानला जात आहे.
ऐतिहासिक क्षण ठरणार?
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एकत्रित मंचावरील कार्यक्रम हा राष्ट्रवादीच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण ठरेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारण्याची शक्यता असून, विरोधकांच्या रणनीतींनाही मोठा धक्का बसू शकतो.

