1 minute reading time (269 words)

[maharashtralokmanch]गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका

गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका

मुंबई : केंद्र सरकारकडून रविवारपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी प्रवृत्ती खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करून सत्तेवर आलेली भाजपाची असल्याची टीका त्यांनी केली.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात आज, रविवारी झालेली वाढ ही प्रत्येक शहरात वेगवेगळी आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजीचा दर 209 रुपयांनी, कोलकातामध्ये 203 रुपये आणि मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी 202 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तथापि, व्यावसायिक सिलिंडरची किंमत वाढली असली तरी घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही वाढ करण्यात आलेली नाही. 29 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात केली होती. त्याआधी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या ग्राहकाला 200 रुपयांची सबसिडी मिळत होती, पण नंतर पुन्हा दोनशे रुपयांची कपात करण्यात आल्याने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 400 रुपयांचा लाभ झाला होता.

यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'बहुत हो गयी महॅंगाई की मार' असा निखालस खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करुन भाजपा सरकार सत्तेवर आले. जनतेला गोडगुलाबी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात जनतेवर महागाईचा महाप्रचंड बोजा लादला. गेल्या 9 वर्षांत गॅस सिलिंडरच्या दरात दुपटीने वाढ झाली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

आताही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे घरगुती सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या आणि दुसरीकडे व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढविले. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, ही भाजपा सरकारची प्रवृत्ती आहे‌. सरकारची ही नफेखोरी सर्वसामान्यांचे जीवनमान उद्ध्वस्त करणारी आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

[Zee 24 Taas]सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महारा...
[ABP MAJHA ]तज्ञांनुसार ब्रिटनमधील वाघनखं शिवरायां...