2 minutes reading time (392 words)

[लोकसत्ता]“आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात, कुणीही….”

“आंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात, कुणीही….”

सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

शरद पवारांनी आमच्याशी डबलगेम केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं सरकार आलं नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आम्ही गुगली टाकला तुम्ही विकेट दिली तर आम्ही काढणारच असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. अशात आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ५५ वर्षात शरद पवारांवर वार केल्याशिवाय हेडलाईन होत नाही असं त्या म्हणाल्या आहेत.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी?

"महागाई वाढते आहे, टॉमेटोचे दर किती वाढले बघा. शेतकऱ्यांचं वास्तव, महागाईमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं गेल्याचं दिसतं आहे. अशात राजकीय चर्चा घडत आहेत. कुठल्याही लोकशाहीत राजकीय हल्ला करणं काही गैर नाही. शरद पवार यांच्यावर वार करत नाही तोपर्यंत बातमी होत नाही हे ५५ वर्षे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आंब्याच्या झाडाला नेहमी दगड मारले जातात, बाभळीच्या नाही. " असं म्हणत सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

"माननीय देवेंद्रजी इतक्या त्या शपथविधीमध्ये अडकले आहेत कारण त्यांना मूळ मुद्द्याला हात घालायचा नाही. या राज्यातील प्रत्येक महिलेची जबाबदारी एक बहीण म्हणून त्यांच्यावर आहे? ते गृहमंत्री आहेत म्हणून मी हा प्रश्न त्यांना विचारते आहे. फडणवीस महागाई, सिलिंडरचे वाढते दर, महिला सुरक्षा, महिलांवर अत्याचार यावर का बोलत नाहीत? त्यांच्याकडे बोलायला काही नाही म्हणून ते दुसरं काहीतरी काढत बसतात. आज त्याचा काही संबंध आहे का? प्रशासन सोडून सातत्याने मागे जाणं, गॉसिप करण्यातच सरकार मग्न असणं हे दुर्दैवी आहे. एकतर ओरबाडून हे सरकार आणलं गेलं आहे. प्रशासन सोडून हे सरकार सगळं करतं आहे."

"मला गॉसिप करायला वेळ मिळतच नाही. मला बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इतर ठिकाणी बरीच कामं असतात. मुळात तो विषय एखाद्या च्युईंगमसारखा झाला आहे. च्युईंगम सुरुवातीला खाता तेव्हा गोड गोड लागतं. चघळून चघळून त्याची चव निघून जाते. असं चव गेलेले विषय चघळण्याची सवय भाजपाला झाली आहे. सिलिंडरचा भाव कमी कसा करणार? महागाई कशी कमी करणार? यावर कुणीही काहीही बोलत नाही. शरद पवार आणि अजित पवार यांचं ऑब्सेशन भारतीय जनता पक्षाला आहे. त्यामुळेच मी म्हटलं होतं की दादा म्हणजे अमिताभ आहेत. कारण भाजपाला शरद पवार आणि अजित पवारांशिवाय काही दिसत नाही. " असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा...
[ABP MAJHA ]अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी दे...