[ETV Bharat]नेत्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होणार; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना, आता लवकरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे.
नेत्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होणार : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पक्ष आघाडीबाबत जो काही निर्णय घेतला जाईल, तो सर्वांशी चर्चा करून घेतला जाईल आणि नेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही." तसंच प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "प्रशांत जगताप यांचा राजीनामा माझ्याकडं आलेला नाही. तसंच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्याबाबत मला माहिती दिलेली नाही. कुणाशी आघाडी करायची याच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, पण जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असल्यानं जगताप नाराज आहेत का? याबाबत मला माहिती नाही, पण पक्ष आघाडीबाबत निर्णय घेण्याआधी सर्वांशी चर्चा केली जाईल."
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : आमचा लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचा आग्रह असून आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो असं सांगत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय घेणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्याचबरोबर प्रशांत जगताप यांच्याशी काल दोन तास चर्चा झाली आहे, लवकरच त्याविषयावर तोडगा निघेल. कोणत्याही पक्षाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव माझ्याकडं आलेला नाही आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप आणि चर्चा यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या पुण्यातूनही अनेक चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप हे अंतिम टप्प्यात आहे. अजित पवारांकडील काही लोक आणि आमच्याकडील काही लोक अशा अनेक चर्चा सुरू आहेत. तसंच आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. ही निवडणूक लढवताना कार्यकर्त्यांचा, पुणेकरांचा आणि पुण्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठेऊन निर्णय घेतला जाईल, असं सुळे यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार जबाबदार नेते : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचं सांगत आमची चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेशीही सुरू आहे. दोन्ही ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र लढले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी जो निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ. मताचे विभाजन होऊ नये, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि जे काही करतोय ते विकासासाठी करतोय. तसंच अजित पवार हे एक जबाबदार नेते आहेत. जर त्यांनी काही विधान केलं असेल, तर ते नक्कीच विचार करून आणि जबाबदारीनं केलं असेल. मात्र अद्याप माझ्याकडं किंवा पक्षाकडं असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

