[My Mahanagar]दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने प्रशांत जगताप नाराज; सुप्रिया सुळे म्हणाल्या, चर्चा करूनच…
पुणे : सध्या पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. अशामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. अशामध्ये या आघाडीवरून शरद पवारांचे नेते प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी नको असा सूर आळवला आहे. त्यांनी यासंदर्भात शरद पवार, पक्षाचे राष्ट्राध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सोमवारी (22 डिसेंबर) भेट घेतली होती. त्यांनतर त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली. याबाबत विचारले असताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, प्रशांत जगताप यांचा राजीनामा माझ्याकडे किंवा शशिकांत शिंदे यांच्याकडे आलेला नाही.
मंगळवारी (23 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "आमचा पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष कोणताही निर्णय घेणार नाही. कालच प्रशांत जगताप यांच्याशी दोन तास चर्चा झाली. कोणताही अधिकृत प्रस्ताव कोणत्याही पक्षाचा माझ्याकडे आलेला नाही. आमची मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. पुण्यामधूनही अनेक चर्चा सुरु असलेल्याच्या बातम्या तुमच्या वाहिन्यांकडूनही येत आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप हे अंतिम टप्प्यात आहे. अजित पवारांकडील काही लोकं आणि आमच्याकडील काही लोकं अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा सुरु आहेत." असे म्हणत त्यांनी सूचक विधान केले आहे.
"आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेले आहे. हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हिताचे जे असेल, तसा निर्णय घेतला जाईल. ही निवडणूक कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून पुण्याचा विकास हा केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल." असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. "आमची चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेशीही सुरु आहे. दोन्ही ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी आम्ही जो निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ." असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

