2 minutes reading time (399 words)

[Loksatta]“जालना लाठीचार्ज प्रकरणी भाजपाने माफी मागावी कारण..”

“जालना लाठीचार्ज प्रकरणी भाजपाने माफी मागावी कारण..”

सुप्रिया सुळे यांची मागणी

Jalna Lathi Charge in Maratha Reservation Protest: जालना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. या घटनेचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसंच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसेसची जाळपोळ करण्यात आली. आज शरद पवारही जालना दौऱ्यावर गेले आहेत. आंदोलनातल्या जखमींची ते विचारपूस करणार आहेत. या सगळ्या घडामोडी होत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी जालना लाठीचार्ज प्रकरणात भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.

जालन्यात घडलेल्या या लाठीचार्जच्या घटनेत अनेक आंदोलक आणि नागरिक जखमी झाले आहेत. जालना येथील अंतरवरली सराटी गावात ही घटना घडली. आता शरद पवार या जालना आणि या गावाचा दौरा करणार आहेत आणि जखमींची विचारपूस करणार आहेत. अंबड रुग्णालयात या आंदोलनातले जखमी उपचार घेत आहेत. शरद पवार हे त्यांचीही भेट घेणार आहेत.

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहाजण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. ते शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलन करत आहेत. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांनी चिंता व्यक्त केली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गावात पोलीस आले. पोलिसांनी सुरुवातीला आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर मात्र अचानक लाठीचार्ज सुरु झाला. तसंच जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.

[Lokshahi Marathi]जालन्यातील पोलिसांच्या त्या कृती...
[Navarashtra]केंद्राचा मुंबईला महाराष्ट्रापासून तो...