[etv bharat]नीटनंतर आता नेट परीक्षेचाही खेळखंडोबा!
परीक्षा रद्द केल्यानं खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा
देशात नीट परीक्षा गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्याचा गोंधळ संपत नाही तर मंगळवारी 18 जून रोजी पार पडलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. यूजीसी नेट परीक्षा रद्द केली असून परीक्षेतील गैरव्यवहाराचा प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत केला जाणार आहे. यावरुन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.
प्राध्यापक तसंच कनिष्ठ संशोधकांसाठी अभ्यास शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी युजीसी माध्यमातून नेट परीक्षा घेण्यात येत असते. मंगळवारी 18 जूनला देशातील 1200 पेक्षा जास्त केंद्रांवर दोन टप्प्यांत नेट परीक्षा घेण्यात आली. तब्बल 9 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मात्र नेट परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करत परीक्षेतील पारदर्शकता आणि पावित्र्य राखण्याच्या कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशभरातील विद्यापीठात पीएचडी प्रवेश, जुनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी युजीसी नेट परीक्षा घेते. 18 जून रोजी रद्द झालेली परीक्षा पुन्हा घेतली जाईल त्याबाबत लवकरच तारीख जाहीर केली जाईल तसंच सदर प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, युजीसी नेट परीक्षेतील पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्याच्या कारणास्तव केंद्र सरकारकडून परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेचा पेपर लीक झाला नसल्याचा दावा एनडीए सरकार करत होतं. मात्र, बिहार पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या अटक सत्रामुळं या दाव्यातील फोलपणा समोर आला आहे. तरी देखील त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. परीक्षेबाबत एनडीए सरकार खात्री देणार का? तसंच एकामागून एक परीक्षा रद्द होत चालल्या आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बेरोजगारीचं संकट असताना त्यात वारंवार घडत असलेल्या अशा प्रकारामुळं तरुणांचं भवितव्य डळमळीत झालंय. परीक्षेची अखंडता सुरक्षित करण्यात वारंवार आलेले हे अपयश आपल्या तरुणांचा विश्वास आणि भविष्य डळमळीत करते. नागरिकांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही. यूपीए सरकारनं बांधलेली सुरक्षा जाळी आणि एनडीए सरकारनं गेल्या 10 वर्षांत उद्ध्वस्त केली. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली आहे.
The NDA Govt cancelled the UGC-NET exam over integrity & fairness concerns. This raises a burning question: Can the NDA Govt truly ensure fair examinations or will exams be cancelled one after another due to widespread frauds at play? The NDA Govt previously claimed no NEET…
— Supriya Sule (@supriya_sule) June 20, 2024