[One India]साताऱ्याच्या विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात, गेली कोमात; वडीलांना हवा इर्मजन्सी व्हिसा,सुळेंची धाव
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय नीलम शिंदे या विद्यार्थीनीचा 14 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत एका रस्ते अपघाताला गंभीर जखमी झाल्या. कॅलिफोर्नियामध्ये नीलम यांना एका कारने धडक दिली, त्यानंतर त्या कोमात गेल्या. सध्या त्या आयसीयूमध्ये दाखल आहे. या अपघातातील आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु, त्यांना भेटण्य़ासाठी जायला त्यांच्या साताऱ्यातील कुटुंबियांना गेल्या आठ दिवसांपासून व्हिसा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलम यांचे वडील तानाजी शिंदे यांना त्यांच्या मुलीच्या अपघाताची माहिती 16 फेब्रुवारी रोजी मिळाली, त्यानंतर ते अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु आतापर्यंत त्यांना यश आलेले नाही. त्यांनी सांगितले की नीलम यांची प्रकृती गंभीर आहे आणि कुटुंबाला लवकरात लवकर तिथे पोहोचण्याची गरज आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नीलम शिंदे यांच्या व्हिसाचा मुद्दा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागासमोर ठेवला आहे. त्यांनी लवकरच व्हिसाची औपचारिकता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. नीलम यांचे काका संजय यांनी सांगितले की, नीलम यांचे हात आणि पाय मोडले होते आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालय व्यवस्थापनाने मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबीयांकडून परवानगी मागितली आहे. नीलम यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबाची उपस्थिती महत्त्वाची आहे.
शिंदे कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते व्हिसा अर्जासाठी स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु पुढील उपलब्ध तारीख पुढील वर्षी असल्याचे सांगितले जात आहे. नीलम गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत राहत होत्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात होती. त्यांच्या कुटुंबाला आशा आहे की सरकार त्यांना लवकरच मदत करेल जेणेकरून ते अमेरिकेत जाऊन त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचू शकतील.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना शिंदे यांच्या वडिलांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की ही एक चिंताजनक समस्या आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन ती सोडवण्यास मदत केली पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी सदर विद्यार्थीनीच्या कुटुंबियांशी संवाद साधला. लवकरच ही समस्या सोडवली जाईल असे आश्वासन दिले आहे. सुळे म्हणाल्या की, भाजप नेते जयशंकर यांच्याशी त्यांचे राजकीय मतभेद असू शकतात पण जेव्हा जेव्हा परदेशात कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला मदत करण्याची वेळ येते तेव्हा जयशंकर सहानुभूती दाखवतात आणि खूप मदत करतात.
