[Political Maharashtra]“सावतांच्या मुलासाठी सर्व पोलीस यंत्रणा हलली, पण देशमुख प्रकरणाबाबत..”
सुळेंचा सरकारवर निशाणा
पुणे : राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा घरी न विचारता तसाच बॅंकाकला निघाला. यानंतर तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दाखल करताच सर्व पोलीस यंत्रणा हलली आणि काही तासातच त्याचा शोध लावून त्याला पुण्यात दाखल करण्यात आले. परंतु दुसऱ्या बाजूला बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणाला साठ दिवस उलटून गेले आहेत. तरीही काही आरोपी फरार आहेत. यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
महाराष्ट्रातील गृहखाते आणि पोलिस किती तत्पर आहेत. याचे उदाहरण काल पहायला मिळाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री महोदयांच्या मुलाचे विमान हवेतल्या हवेत परत बोलावून राज्यातील यंत्रणेने आपली कुशलता सिद्ध केली. परंतु याच यंत्रणेला मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेली साठ दिवसांपासून सापडत नाही, ही बाब पटण्यासारखी नाही. अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
तर कालच्या घटनेत वरपासून खालपर्यंत यंत्रणा हलली आणि सदर नेत्याच्या पुत्राचे विमान हवेतल्या हवेत परत फिरले. अशाच पद्धतीने गृहखात्याने मन लावून काम केले तर कृष्णा आंधळे गजाआड होईल. अतिविशिष्ट लोकांच्या किरकोळ घरगुती कामांसाठी मनापासून झटणारे गृहखाते सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अशीच तत्परता का दाखवत नाही ? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला केला आहे.
