2 minutes reading time (418 words)

[timesnownews]पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा

पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा

खासदार सुप्रिया सुळेंंची मागणी

राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट - युजी आणि युजीसी - नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे. सरकार हा प्रस्ताव स्वीकारुन लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित करणाऱ्या या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी तयार होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील आणि देशभरातील 25 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेल्या नीट - युजी परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. पण त्यावर सरकारी पातळीवर काहीही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे युजीसी - नेट परीक्षेचा पेपरदेखील फुटल्याचे प्रकरण समोर आले. पेपरफुटी प्रकरणामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीची उपयुक्तता आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे." 

"विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याऱ्या या परीक्षा घेण्यात सरकारने दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या प्रकरणात केवळ निष्काळजीपणाच दिसून येत नाही तर यात भ्रष्टाचारही झालेला आहे. त्यासाठी देशभरातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने मी विनंती करते कि, सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून आज दिवसभरातील सभागृहापुढील अन्य सर्व विषय बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करून कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा. सभागृहाने यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

देशभरात 5 मे रोजी नीट - यूजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर होणार होती. यासाठी एकूण 23 लाखा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नीट पेपर फुटीची प्रकरणे समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यातील काही संशयितांना ताब्यातही घेण्यात आले आहे. नीट परीक्षेच्या निकालात एकूण 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने वाद निर्माण झाला. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून या परीक्षा घेण्यात येतात. दरम्यान , या प्रकरणात विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देताना चुक झाल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कबूल केले. तसेच ग्रेस मार्क देण्यात आलेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे असे एनटीएने सांगितले. पुन्हा परीक्षा घेतल्यामुळे रँकिंगमध्ये फारसा बदल होणार नसल्याचे काही तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.  

[mumbaioutlook]पेपरफुटीवर चर्चेसाठी कामकाज स्थगित ...
[Dainik Prabhat]"ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना सु...