[Dainik Prabhat]"ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या
जेव्हा 150 खासदार निलंबित झाले होते...
लोकसभेने बुधवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड केली. दरम्यान, त्यांच्या निवडीवर सभागृहातील अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.
लोकसभेत अध्यक्षांचे अभिनंदन करताना सुप्रिया सुळे यांनी,मला अजूनही आठवतंय की, इतर नेत्यांसोबत मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटले होते. तुम्ही जेव्हापासून या जागेवर आहात, तेव्हापासून तुम्ही आमची काळजी घेतली आहे. पण गेल्या पाच वर्षात कोविडमध्येही तुम्ही ज्या प्रकारे आमची काळजी घेतली, तुम्ही नेहमी प्रत्येक सदस्याला फोन करून त्यांच्या तंदुरुस्तीबद्दल विचारले, कोविडच्या काळात तुमच्या संपूर्ण टीमने केलेले काम, ज्या पद्धतीने हे सभागृह चालवले गेले मी तुमचे खूप आभार मानते या सर्व गोष्टींसाठी मी अभिनंदन करतो.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात तुम्ही खूप चांगले काम केले आहे, पण ही खेदाची गोष्ट आहे की, जेव्हा आमचे सर्व मित्र, 150 जण निलंबित झाले, तेव्हा सर्वांनाच खूप वाईट वाटले. असे काही होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असतील. पुढील पाच वर्षात निलंबनाच तुम्ही विचार करू नका. आम्ही नेहमी संवादासाठी तयार आहोत. असे म्हणत त्यांनी बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या.
ओम बिर्ला यांच्या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह सर्व नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 1985 मध्ये बलराम जाखड यांच्यानंतर ओम बिर्ला हे एकमेव लोकसभेचे अध्यक्ष आहेत ज्यांनी दोन पूर्ण टर्म सेवा केली आहे. पारंपारिक विधीनंतर विरोधी पक्षनेत्यांनी बिर्ला यांचे सभापती झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी खासदारांनी विरोधकांचा आवाज दाबू नये, असे आवाहनही केले.
