[My Mahanagar]सुप्रिया सुळे, सुनील तटकरेंची सभागृहात जुगलबंदी
खऱ्या राष्ट्रवादीवरुन कोण, काय म्हणाले?
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि अध्यक्ष कोण, याचा निवाडा केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या चिन्हांवर लोकसभा निवडणूक लढवली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार लोकसभेत पोहोचला आहे. मात्र या दोन्ही गटांचा 'राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी' सामना काही संपलेला नाही.
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे खासदार आहेत. त्यातील एका राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) निवडणूक आयोगाने ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणाऱ्या पक्षाला (शरद पवार गट) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आठ खासदार निवडून देत महाराष्ट्रातील जनतेने जनमान्यता दिली. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रसेचा (अजित पवार गट) एकमेव खासदार निवडून आला आहे. ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित दादा गटाचे सुनील तटकरे यांच्यात खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यावरुन जुगलबंदी पाहायला मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेत आठ खासदार आहेत. त्यामुळे त्यांना अजित पवार गटापेक्षा अधिक वेळ सभागृहात बोलण्यासाठी संधी मिळणार आहे. याची प्रचिती बुधवारी लोकसभाध्यक्षाच्या निवडीनंतर आली. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात 'राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजनल संस्थापक' आणि आमचे प्रिय नेते शरद पवार अशी केली. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खासदारांच्यावतीने ओम बिर्ला यांना अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर अजित पवार गटाचे एकमेव खासदार सुनील तटकरे यांना बोलण्याची संधी मिळाली. तटकरेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात 'ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस' अशी केली. सुप्रिया सुळेंनी 'राष्ट्रवादी काँग्रेसचे ओरिजनल संस्थापक' असा उल्लेख केला होता, त्याला प्रत्युत्तर देत तटकरेंनी जोर देऊन 'ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस' असा उल्लेख केला. नव्या संसदेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असणार आहेत. मात्र आठ खासदार असलेल्या शरद पवार गटाला अजित पवार गटापेक्षा जास्त वेळ मिळणार हे लोकसभाध्यक्षांच्या निवडीनंतर झालेल्या शुभेच्छापर भाषणांतूनच दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना सभागृहातही येत्या काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
