[Sakal]Sharad Pawar: ...तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
जो पर्यंत शेतक-यांना कांदा व दूधाला दरवाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहू, मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन याच आठवड्यात भेटू, दरवाढ मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
कांदा व दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. 7) बारामतीत आंदोलन केले गेले. या प्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या. .
सुळे म्हणाल्या, राज्यातील सत्तेच्या राजकारणात शेतक-यांचे प्रश्न मागे पडले, संसदेत चर्चा होऊ शकली नाही, शेतक-यांबद्दल कमालीची उदासिन भूमिका वारंवार दिसते आहे. या प्रश्नावर सहकार्याची भूमिका आहे, सरकारने बोलावले तर आमची चर्चेची तयारी आहे. सरसकट कर्जमाफीची आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि जो पर्यंत भाववाढ मिळत नाही तोवर शांततामय मार्गाने आंदोलन करत राहू, न्याय मिळत नाही तो वर स्वस्थ बसणार नाही.
युगेंद्र पवार म्हणाले, बारामती भागात जिरायत भागातील शेतकरी अडचणीत आहे. त्यांच्या कांदा व दुधाला भाव मिळत नाही ही अडचण दौरा करताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडलीहोती. शेतक-यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून सरकारशी भांडायला हवे, अशी भावना होती, त्या मुळेच हे आंदोलन आम्ही करत आहोत. सरकारला जाग यावी हीच या मागची भावना आहे. शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा शेतक-यांना चांगले भाव मिळत होते. .
या प्रसंगी अँड. एस.एन. जगताप, वनिता बनकर, आरती शेंडगे, संदीप गुजर, सत्यव्रत काळे, प्रियांका शेंडकर, प्रशांत बोरकर, राजेंद्र जगताप, जयकुमार काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दूध मोफत वाटप...दूध उत्पादकांनी दूध ओतून निषेध न करता दूधाच्या पिशव्या व कांदा बारामतीकरांना मोफत देत आंदोलन केले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले..व्यवसायाला हेअरकट मिळतो, शेतक-यांना का नाही...एनपीए खाते झाल्यावर बँका हेअरकट देतात, त्याप्रमाणे शेतक-यांना सरसकट कर्जमाफी का दिली जात नाही, असा सवाल संसदेत उपस्थित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
