[NDTV Marathi]लाडकी बहीण' कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिलांना धमकी
सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आजोजित करण्यात आला आहे. या कार्यंक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. मात्र या कार्यक्रमाआधीच सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत सरकारवर गंभीर आरोपी केले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी एक मेसेज ट्वीट करत म्हटलं की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवत आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलावणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार."
"अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहीण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच."
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहिलंय की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे Approved मेसेज आला आहे, त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे. यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. सर्वांनी येणे आवश्यक आहे, ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल."