2 minutes reading time (427 words)

[sarkarnama]हा महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही

हा महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही

सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Sharad Pawar Yewala Meeting : महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही. आज मात्र इनकम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून राज्याला दिल्लीपुढे झुकवण्याचे षडयंत्र दिल्लीतून सुरू आहेत. ही लढाई त्यांनी सुरू केली असली तरी त्याचा शेवट आपण करणार आहोत. महाराष्ट्राविरोधात कुणी कट कारस्थान करत असेल तर त्याला सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. त्याची सुरूवात नाशिकमधील येवल्यातून झाली आहे. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या अवस्थेस केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.

सुळे म्हणाल्या, "सध्या कांद्याला कवडीमोल दर आहे. याची वारंवार जाणीव करून देऊनही केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पावले उचलली नाहीत. टोमॅटो १५० रुपये दराने विकत घ्यावा लागत आहे. तो दर शेतकऱ्यांना मिळत नाही. मग मधले पैसे जातात कुठे? मी आता कंद्याच्या दरावर केंद्र सरकारशी भांडणार आहे."

 सुळे यांनी देशातील महागाई आणि बेरोजगारीवरही बोट ठेवले. त्या म्हणाल्या, "आज आपल्यातील काही लोक भाजपसोबत गेले आहेत. मात्र महागाई वाढतच आहे. आजही सिलिंडरचे दर वाढले आहेत. महागाई आणि बेरोजगार वाढत आहेत. आजपर्यंत येवल्यात किती कंपन्या आल्या? आपल्या लोकप्रतिनिधींनी ना कांद्याच्या दरावर आवाज उठवला ना रोजगारासाठी प्रयत्न केले. आता शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवली तर तुमचा विश्वास सार्थ ठरेल याचा विश्वास देते."

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक ठिकाणच्या महिला पाठबळ देत असल्याचेही सुळे यांनी सांगितले. सुळे म्हणाल्या, प्रत्येक ठिकाणी गेलो तर महिला सांगतात की बाई तू लढ आम्ही तुमच्यासोबत आहोत. घबरू नका लढा. पण मी घाबरत असते तर तिकडे गेले नसते का? ही विचारांची लढाई आहे."

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात काम करत आहे. मात्र कधी कुठलेही पद मागितले नसल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, फुटलेले तुमच्यावर अनेक आरोप करतात असे अनेकजण म्हणत आहेत. पण त्यांच्या आरोपांवर मी जास्त बोलत नाही. आजपर्यंत मी पक्षाकडून काहीही मागितले नाही. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी पक्षासाठी आणि जनतेसाठी काम करत राहिले. पक्षाच्या विचारांसाठीच मी काम करत राहिले."

दिल्लीतील अदृश्य शक्तीचा राज्यातील घडामोडींवर प्रभाव असल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे. सुळे म्हणाल्या, "राज्यात षडयंत्र सुरू आहे. काल बाळासाहेबांची शिवसेना फोडली. आज पवारांची राष्ट्रवादी फोडली. देशात विरोधक म्हणून शरद पवार यांचा बुलंद आवाज आहे. तो शांत करण्यासाठी पवार यांच्याबाबत दिल्लीतील अदृश्य शक्ती काम करत आहे. मात्र इतिहास आहे दिल्लीसमोर कधीही महाराष्ट्र झुकला नाही.ही सन्मान आणि स्वाभिमानाची लढाई आहे. ही लढाई येवल्यातून सुरू झाली आहे. लढाई त्यांनी सुरू केली त्याचा शेवट आपण करणार आहोत."

[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचं येवल्याच्या नागरिक...
[tv9marathi]आलं तर आलं तुफान…