[lokmat]‘आनंदाचा शिधा’मधील तेल निकृष्ट, डाळीत किडे, तर रव्यात...,
सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप"
राज्यातील गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड करता यावं यासाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा या माध्यमातून काही अन्नपदार्थांचं वाटप अवध्या १०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये सरकारने 'आनंदाचा शिधा'वाटप केलं आहे. मात्र सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाचा शिधामधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामधील तेल निकृष्ट आणि डाळी किडलेल्या आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात त्या म्हणाल्या की, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला 'आनंदाचा शिधा' हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले. हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
दरम्यान, आनंदाचा शिधाच्या माध्यमातून पुरवण्यात येत असलेल्या अनपदार्थांच्या पाकिटावरील छापील वजनापेक्षा त्यातील अन्नपदार्थांचं वजन कमी असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.