[Lokmat]देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो
फडणवीस जितक्या वेळी बंदूक रोखतील तेव्हा...
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असलेला अक्षय शिंदे सोमवारी पोलीस चकमकीत ठार झाला. संध्याकाळी अक्षयला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्याच वेळी आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. निलेश मोरेंच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, त्यात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. या घटनेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर खरमरीत टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "घडलेला प्रकार ही काही वेब सिरीज नाही, हा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीवर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. देवेंद्र फडणवीस जितक्या वेळी बंदूक आमच्यावर रोखतील तितक्या वेळा आम्ही त्यांना संविधान दाखवू. यासाठी त्यांच्या गोळ्या खायची वेळ आली तरी चालेल. फडणवीसांचे वागणे हे छत्रपती शिवराय आणि शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अशोभनीय आहे.
"बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला भरचौकात फाशी द्यायला हवी होती. यातून देशभरात शिवरायांच्या काळातील न्याय महाराष्ट्रात अजूनही दिला जातो हा संदेश गेला असता. वाईट कृत्य करणाऱ्यांना धडकी भरावी, अशी शिक्षा द्यायला हवी होती. सरकारने जे काम करावे ते संविधानाच्या चौकटीत राहून करावे. देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहेत, त्यांनी असे वागणे योग्य नाही. त्या घटनेत सर्व जण शिंदे आहेत, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फडणवीसांची नाही का?\" असा सवालही सुप्रिया सुळेने उपस्थित केला.