[ABP MAJHA]बंदुकीचा धाक, पैशाचा वापर ते निववडणूक आयोगाचं दुर्लक्ष,
संसदेत आवाज उठवणार, बिनविरोध निवडणुकांवरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule : महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपसह, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे काही घडत आहे, ते माझ्यासह राज्यातील जनतेच्या मनाला अस्वस्थ करणारे असल्याचे सुळे म्हणाल्या. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे असल्याचे सुळे म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका होत आहेत. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यामध्ये धमकीचे प्रकार, बंदुकीच्या जोरावर दहशत, पैशांचा अतोनात वापर, उमेदवारी अर्ज माघारीसाठी विविध प्रकारचा दबाव, ब्लॅकमेलिंग, बोगस मतदान आणि मतदारांना दिली जाणारी प्रलोभने असे अनेक गंभीर प्रकार माध्यमांतून सातत्याने समोर येत असल्याचे सुळे म्हणाल्या. हे सर्व घडत असताना निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष अधिकच चिंताजनक आहे. सुदृढ लोकशाहीसाठी हे अतिशय धोकादायक आहे. मी याबाबत यापूर्वीही संसदेत आवाज उठवला आहे, आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढेही हे मुद्दे सातत्याने मांडत राहावे लागणार आहेत असे सुळे म्हणाल्या.
मनपा निवडणुकीमध्ये चांदा ते बांदा भाजप, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. इतकेच नव्हे तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा धमकी देणारा व्हिडिओ सुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल केला. यामध्ये ते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना थेट सुरक्षा काढून टाकण्यासाठी धमकी देत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवारांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार महाराष्ट्रातील 69 पैकी 68 जागांवरती बिनविरोध निवडून आले आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपली निवडणूक व्यवस्था संकटामध्ये सापडत झाली आहे. पैशाची ताकद आणि राजकीय दबाव यावरच आता निवडणूक निकाल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

