2 minutes reading time (322 words)

[Jai Maharashtra News]बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

Supriya Sule: राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या 'बिनविरोध' निवडीच्या सत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून ही अघोरी स्पर्धा सुरू आहे,' असा घणाघात करत त्यांनी याविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचा इशारा दिला. 

लोकशाहीचा गळा घोटला जातोय - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, तब्बल 7-8 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. तरी मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. नोटा (NOTA) चा पर्याय उपलब्ध असतानाही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले जात आहे. उमेदवारांना धमकावणे, बंदुकीचा धाक दाखवणे, ब्लॅकमेलिंग आणि पैशांचा अतोनात वापर करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहे, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या सर्व प्रकारांमध्ये निवडणूक आयोग मूग गिळून गप्प का आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. निवडणूक यंत्रणा दबावाखाली असून आयोग या गंभीर प्रकारांकडे दुर्लक्ष करत आहे. राजकीय दबाव आणि पैशाच्या जोरावरच आता निकाल ठरवले जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बिनविरोध निवडणुकीविरोधात विरोधक आक्रमक

राज्यातील एकूण 69 पैकी 68 जागांवर महायुतीचे (भाजप आणि शिंदे गट) उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना धमकी देत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केवळ शिवसेना (UBT) किंवा मनसेच नाही, तर सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना विविध मार्गांनी निवडणूक रिंगणातून हटवल्याचा आरोप केला जात आहे. 

राजकीय व्यवस्था धोक्यात?

निवडणूक व्यवस्था आता पूर्णपणे संकटामध्ये सापडली असून, केवळ सत्तेचा गैरवापर करून निवडणुका जिंकल्या जात आहेत, असे सुळे यांनी म्हटले आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण हा लढा संसदेत अधिक तीव्र करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

...

Supriya Sule: बंदुकीचा धाक अन् पैशांचा पाऊस...; राज्यातील बिनविरोध निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा संसदेत आवाज उठवणार

'लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून ही अघोरी स्पर्धा सुरू आहे,' असा घणाघात करत त्यांनी याविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचा इशारा दिला. <br/
[News On Air]बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे म...
[ABP MAJHA]बंदुकीचा धाक, पैशाचा वापर ते निववडणूक आ...