2 minutes reading time (425 words)

[maharashtratimes]संजय राऊतांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी सुप्रिया सुळे अमित शाहांना भेटणार

संजय राऊतांच्या झेड प्लस सुरक्षेसाठी सुप्रिया सुळे अमित शाहांना भेटणार

पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे, हे अतिश्य गंभीर आहे. गृहमंत्र्यांना कारभार सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्या शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

यावेळी सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांना मिळालेल्या धमकीवरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. संजय राऊत प्रसिद्धीसाठी स्टंट करतात, असा आरोप शिंदे गटातील एका नेत्याने केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, हे वाचाळवीरांचं सरकार आहे. मंत्री आणि आमदार काहीही बोलले तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण मी तातडीने संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे. अमित शाह यांनी त्यामध्ये लक्ष घालून संजय राऊत यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे. संजय राऊत हे खासदार आणि देशातील वरिष्ठ नेते आहेत, सुप्रिया सुळे यांनी म्हटले. दरम्यान, या धमकी प्रकरणानंतर मुंबईतील कांजूरमार्ग पोलिसांचे पथक संजय राऊतांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे.

संजय राऊतांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी

खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली में मिल, तुझे एके ४७ से उडा देंगे, असा संदेश त्यांना पाठवण्यात आला आहे. मला धमकी मिळाल्यानंतर मी पोलिसांना कळवले आहे. मला राज्य सरकारकडून फारशा अपेक्षा नाहीत. पण मी या धमक्यांना घाबरत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. धमक्या येत असतात पण विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही.

राज्यातील सुरक्षाव्यवस्था ही महाराष्ट्रातील गद्दार गटाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसाठी आहे. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा गद्दार गटासाठी तैनात करण्यात आल्याने महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारा अत्याचार आपण पाहतोय. परवा पोलीस खात्यातील वैभव कदम यांनी आत्महत्या केली, असे प्रकार रोज घडत आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याकडे पाहत नाहीत. आम्हाला धमक्या आल्याची माहिती आम्ही देतो तेव्हा गृहमंत्री फडणवीस हा स्टंट असल्याचे सांगून चेष्टा करतात. ठाण्यातील एका गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याने मला धमकी दिली. या सगळ्यामागे श्रीकांत शिंदे आहेत. पण ते प्रकरणही गृहमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने घेतले नाही, अशी खंत संजय राऊत यांनी बोलून दाखवली. काल रात्री पोलीस निरीक्षकांना मी रात्री कळवलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून कळवण मला गरजेचं वाटले. पण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. विरोधकांना तुरुंगात टाकण्यापर्यंत किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

[TV9 Marathi]'सुषमा स्वराज मर्यादा पुरुषोत्तम म्हण...
[saamtv]म्हणून संजय शिरसाटांना पाठीशी घालताय का?