1 minute reading time (284 words)

[sarkarnama]''...त्यामुळे 'राष्ट्रवादी' कोणाची हे वेगळं सांगायची गरज नाही''

 ''...त्यामुळे 'राष्ट्रवादी' कोणाची हे वेगळं सांगायची गरज नाही''

सुप्रिया सुळेंचे विधान!

Shirdi News : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत मोठे विधान केले आहे. पुण्याहून हेलिकॉप्टरने पारोळ्याला जात असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर काकडी विमानतळावर उतरावे लागले. यावेळी त्यांनी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी राष्ट्रवादी कोणाची, खोके सरकार, आरक्षणाचा वाद आणि महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर मतं मांडली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जा, कोणालाही विचारा राष्ट्रवादी कुणाची? याचे उत्तर एकच, शरद पवार असेच येईल. पवारांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे केले आहे. देशाच्या कान्याकोपऱ्यांपर्यंत नेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची हे वेगळे सांगायची गरज नाही".

सुप्रिया सुळे यांनी यावेळी राज्यातील भाजप महायुतीच्या सरकारचा खोके सरकार असा उल्लेख केला. पालकमंत्री नेमण्यासाठी हे खोके सरकार दिल्लीला जाते. आता राज्यात अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार दिल्लीला का जात नाही, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत महत्त्वाची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामावर सर्वसामान्य जनतेने शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे त्यांच्याविषयी आदर असून, ते माझे मोठे भाऊ आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाष्य करताना विरोधकांनी चौकटीत राहून भाष्य करावे, असा त्यांनी विरोधकांना सल्ला दिला.

राज्यात मराठा समाजाचा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. केंद्रावर मराठा आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनात आपण दबाव आणणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना आपण याबाबत विधेयक मांडण्याची विनंती करणार आहे. मराठा आरक्षणाबरोबर धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

[politicalmaharashtra]“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्या...
[etvbharat]काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणालाही...