2 minutes reading time (356 words)

[loksatta]“सत्ताधारी आमदारांचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास नाही”

“सत्ताधारी आमदारांचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास नाही”

'त्या' आंदोलनावरून सुप्रिया सुळेंचा टोला

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. आमदारांच्या गाड्या अडवणं, नेत्यांना घेराव घालण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. मतदारसंघांमधील नागरिकांचा रोष पाहून अनेक आमदारही आता मराठा आरक्षणासाठी आंदोलनं करत आहेत. सत्ताधारी पक्षांमधील काही आमदारांनी मंगळवारी दुपारी राजभवनाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षांना टोला लगावला आहे.

शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केलं. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास नाही का? विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती. तेथे यासंदर्भात चर्चा होणार होती. ज्या राजभवनाबाहेर आमदार आंदोलन करत होते तिथून सह्याद्री अतिथीगृह (जिथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली) हे अंतर केवळ पाच ते सहा मिनिटांचे आहे. पण या आमदारांपैकी कुणीही तिकडे गेले नाही.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, सह्याद्री अतिथीगृह सोडून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. यावरून या आमदारांचा सरकारवर विश्वास राहिला नसल्याचे दिसून येते. या सरकारमध्ये धोरणलकवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा देणे गरजेचे आहे.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राजभवन येथे जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अचानक ही भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

...

"सत्ताधारी आमदारांचा शिंदे-फडणवीसांवर विश्वास नाही", 'त्या' आंदोलनावरून सुप्रिया सुळेंचा टोला | Supriya Sule Slams Shinde Fadnavis Over BJP MLAs Protesting for Maratha Reservation | Loksatta

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सह्याद्री अतिथीगृह सोडून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. यावरून या आमदारांचा सरकारवर विश्वास राहिला नसल्याचे दिसून येते.
[mumbaitak]देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही?, सुप्...
[mymahanagar]सत्ताधारी आमदारांचा मुख्यमंत्री आणि उ...