[TV9 Marathi]मुंडेंचा राजीनामा… सुप्रिया सुळेंनी केली अजित पवार यांची पोलखोल; ट्विट दाखवत तोंडघशीच पाडले
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून कालपासूनच राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिल्याची मोघम प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी तर अजित पवार यांचं म्हणणं खोडून काढत, अजित पवार यांना तोंडघशीच पाडलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी मीडियााशी संवाद साधताना अजित पवार यांना चांगलंच तोंडघशी पाडलं. छगन भुजबळ आणि पुण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं असं स्टेटमेंट आलंय की, नैतिकतेवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. पण धनंजय मुंडेंचं ट्विट आलंय. ते सर्वांनी पाहावं आणि वाचावं. मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा न ही नाही. त्यांनी स्वत:च्या तब्येतीमुळे राजीनामा दिला आहे, असं ट्विट केलंय, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं म्हणणंच खोडून काढलं. सुप्रिया सुळे एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी थेट मोबाईल उघडून मुंडेंचं ट्विट दाखवत यात कुठे नैतिकतेचा मुद्दा आहे? असा सवालच केला.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं म्हटलं होतं. पण सुप्रिया सुळे यांनी अजितदादा कसे खोटे बोलत आहेत हे मुंडे यांचं ट्विट दाखवत स्पष्ट केलं. त्यानंतर आज अजित पवार यांनी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री असूनही विधानसभेत जाणं टाळलं. तसेच नंतर मीडियाशी बोलणंही टाळलं. अजितदादा यांचा चेहरा त्रासलेला होता. त्यांची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जात होती. संतोष देशमुख प्रकरणामुळे अजितदादा गटाची प्रचंड बदनामी झाल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते चिंतीत असल्याचंही सांगितलं जात आहे. मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता, असंही हे नेते म्हणताना दिसत आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे", असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी म्हटले.
