1 minute reading time (284 words)

[loksatta]“त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढणार असतील तर…”

“त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढणार असतील तर…”

प्रियंका गांधींच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लढण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रियंका गांधी महाराष्ट्रातून निवडणूक लढणार असतील तर त्या कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढतील, याबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंका गांधी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, "प्रियंका गांधी महाराष्ट्र आणि देशातील कर्तृत्ववान महिला आहेत. त्यांची प्रचंड संघर्ष केला आहे. त्या लोकसभा लढणार असतील तर आम्ही मनापासून स्वागत करू. त्या महाराष्ट्रातून लढणार असतील तर आम्हाला आनंदच होईल." सुप्रिया सुळे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

दुसरीकडे, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांनीही यावर प्रियंका गांधींच्या महाराष्ट्रातून निवडणूक लढण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. जर प्रियंका गांधी महाराष्‍ट्रात लोकसभेची निवडणूक लढणार असतील, तर ही सर्वात चांगली गोष्‍ट आहे. आम्‍ही त्‍यांचे स्‍वागतच करतो. अमरावती मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, म्‍हणून अडचण आहे. अन्‍यथा, प्रियंका गांधी यांना येथूनच लढण्‍याचा आग्रह केला असता, असं यशोमती ठाकुर म्हणाल्या.

खरं तर, राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी यशोमती ठाकूर यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन त्‍यांची भेट घेतली. यासंदर्भात विचारले असता, आमदार यशोमती ठाकुर म्‍हणाल्‍या, २०२४ ची निवडणूक आम्‍ही महाविकास आघाडी म्‍हणून एकत्रितपणे लढवण्‍याची तयारी केली आहे. सुप्रिया सुळे या सध्‍या विदर्भाच्‍या दौऱ्यावर आहेत. त्‍यांचा हा दौरा महाविकास आघाडीला उभारी देणारा ठरणार आहे.

[news18marathi]'घाटी व नांदेड येथील 50 लोकांच्या म...
[Zee 24 Taas]सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण महारा...