[ETV Bharat]'ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपूर फरक आहे'-सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा
पुणे-महानगरपालिका निवडणुकीच रणसंग्राम सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. तसेच दुसरीकडे महायुतीचे तिन्ही पक्ष वेगळे लढत असल्यानं त्यांच्यातही एकमेकांवर सातत्यानं सुरू आहे. अजित पवार बोलतात, माझं काम बोलते, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, " जशी आमची बोलायची जी ताकद आहे. तशीच आमची ऐकायची ताकद आहे".
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीसह विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, "दरवर्षी मी माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंधखेड राजा येथे जात असते. यंदा निवडणूक असल्यानं जबाबदारी दिली असल्यानं आज सकाळी लाल महाल येथे येऊन माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन केलं".
गुन्हेगारीच्या समस्येवर चर्चा केली पाहिजे- खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, " महाराष्ट्रातली आणि पुण्यातली गुन्हेगारी थांबवावी, अशी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती. पुण्यामधील गुन्हेगारी का थांबत नाहीय? कोयता गँग का थांबत नाही? पुण्यातला क्राईम आजचा नाही, मात्र सरकार आल्यापासून ही गुन्हेगारी वाढली आहे. हा भारत सरकारचा डेटा सांगत आहे. हे डबल इंजिनचं सरकार आहे. केंद्रात आणि राज्यात त्यांचं (भाजपा) सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आत्मचिंतन केलं पाहिजे. सर्वपक्षीय बैठक बोलावून गुन्हेगारीच्या समस्येवर चर्चा केली पाहिजे, अशी खासदार सुळे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
पुणेकरांना दिलेलं आश्वासन पाळण्यात येईल-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोफत मेट्रो प्रवास देऊ, असे जाहीरनाम्यात आश्वासन दिलं आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करायला आपल्या भाषेचं काय जाते, अशी टीका केली होती. त्यावर खासदार सुळेंना विचारलं असता, त्यांनी म्हटलं, "लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. जो शब्द आम्ही पुणेकरांना दिला आहे, तो 100 टक्के पाळण्यात येईल. मेट्रो आणि बस यावरील तज्ञांकडून आम्ही सल्ला घेऊन आणि अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे. पुणेकरांवर अतिरिक्त बोजा पडणार नाही, याची देखील काळजी घेतली आहे".
प्रकाश जावडेकर कुठे आहेत- महापालिकेच्या निवडणुकीत अमोल बालवडकर यांच्याकडून भाजपावर टीका होत आहे. याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की," अमोल बालवडकर भाजपामध्ये अस्वस्थ असतील म्हणून त्यांनी तो पक्ष सोडला असेल. या सगळ्या यंत्रणेचा आधी भाग असेल. हे आरोप प्रत्यारोप किंवा हे व्हिडिओ खरे खोटे आहेत की नाही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणणारी भाजपा पार्टीमध्ये गिरीश बापट हे आज हवे होते. प्रकाश जावडेकर यांनी 2014 मध्ये काँग्रेस विरोधात रान उठवलं होतं. त्यांनी अतिशय सुसंस्कृतपणे कॅम्पेन केलं होतं. आज प्रकाश जावडेकर या सगळ्यात कुठे आहेत. ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपूर फरक आहे", असं यावेळी त्यांनी सांगितलं.
पुण्यात महापौर हा राष्ट्रवादीचाच- भाजपाच्या 110 च्या घोषणेबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, " भाजपानं 400 पारचा घोषणा दिली होती. जे काय झालं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे आता 110 जागा त्यांच्या फिक्स आहेत, यावर माझा विश्वास नाही. जर फिक्स असतील तर त्या कशा फिक्स असतील? त्यांनी कशा पद्धतीनं फिक्स केल्या आहेत, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यात किती जागा येईल, मला माहित नाही. मी नंबरवर विश्वास ठेवत नाही. पण, पुण्यात महापौर हा राष्ट्रवादीचाच असणार", असा त्यांनी विश्वास व्यक्त केला

