[ETV Bharat]तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे - सुप्रिया सुळे
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वच स्तरातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका होत आहे. याप्रकरणी आज रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. तर शासनाच्या समितीनं दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राजीनामा देऊन प्रश्न सुटत नाही. सरकारने कृती केली पाहिजे. यात रुग्णालयाची चूक असून रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसंच ज्याच्यामुळं हे घडलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे". खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तनिषा भिसेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
"याप्रकरणाचा अहवाल आला आहे. त्यात दिसतंय की रुग्णालयाची चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. २४ तासांच्या आत आम्हाला त्या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळं ही हत्या झाली आहे, त्यांच्यावर कारवाई झालेली पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. आता काय. दहा समित्यांच्या अहवालाची वाट बघणार का सरकार? वाट कुणाची बघताय, जीव गेला आहे ती कुणाची तरी, लेक आहे, बायको आहे, आई आहे, बहीण आहे. कधीतरी या सरकारनं थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा".
"मी विरोधक म्हणून आलेली नाही. या प्रकरणात राजकारण कोणीही आणू नये. मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पारदर्शकपणे कारवाई झाली पाहिजे. एका डॉक्टरमुळं सगळे डॉक्टर वाईट नसतात. रुग्णालय, रुग्णालयचा मॅनेजर, प्रशासन त्यावेळी सीसीटीव्हीमध्ये जे कोणी दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. रुग्णालयातील सीसीटीव्ही भिसे कुटुंबाला दाखवले पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकारने याप्रकरणी जबाबदारी घेतली पाहिजे" असं यावेळी सुळे म्हणाल्या.
