2 minutes reading time (374 words)

[sarkarnama]केंद्रीय मंत्र्यांचा बारामती दौरा ; सुप्रिया सुळे म्हणतात..

केंद्रीय मंत्र्यांचा बारामती दौरा ; सुप्रिया सुळे म्हणतात..

 भारतीय जनता पक्षाकडून बारामती या लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांचा बारामतीमध्ये अनेक वेळा दौरा झाला आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दौरा केला होता, यानंतर आता केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचा नुकतंच बारामतीत आगमन झालं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रल्हाद पटेल यांचे बारामतीत स्वागत केले आहे, तसेच मंत्र्यांनी शासकीय कार्यक्रमात प्रोटोकॉल न पाळण्याने नाराजीही व्यक्त केली आहे. सुळे ट्वीट करत म्हणाल्या. "आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हादजी पटेल यांचे आगमन झाले आहे. आपल्या मतदारसंघात केंद्रातील मंत्री येतात ही अतिशय आनंदाची बाब आहे. अतिथी देवो भव ! या तत्वानुसार या मतदारसंघाची खासदार या नात्याने त्यांचे मी जनतेच्या वतीने हार्दिक स्वागत करते."

"प्रल्हादजी काल इंदापूर येथे केंद्र सरकारच्या 'जल जीवन मिशन' या शासकीय कार्यक्रमाच्या भूमीपूजन आणि उद्घाटनासाठी आले होते. शासकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री आल्यास तेथे स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रण देणे हा प्रोटोकॉल आहे. कारण शासकीय कार्यक्रम हा जनतेचा असतो, कुण्या एका पक्षाचा असत नाही. परंतु तसे झाले नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

"महत्वाची नमूद करण्याची बाब अशी की, 'जल जीवन मिशन'च्या अंतर्गत आपल्या मतदारसंघात कामे व्हावी यासाठी माझ्यासह इंदापूरचे आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवश्यक त्या पातळ्यांवर उचित पाठपुरावा केला होता. यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला, ही वस्तुस्थिती आहे, " असे सुळे म्हणाल्या.

"शासकीय कार्यक्रमात राजकीय हेवेदावे, पक्षीय मतभेद, मनभेद आदी दूर ठेवायचे असतात. परंतु या संकेताला पुर्णतः हरताळ फासून व स्थानिक लोकप्रतिनिधिंना डावलून हा कार्यक्रम फक्त भाजपाचा राजकीय कार्यक्रम असावा यापद्धतीने पार पाडण्यात आला. हे अतिशय संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. या मनोवृत्तीचा निषेध," असे ही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[TV9 Marathi ]'राज्यातील गद्दार सरकारची 20 तारखेला...
[TV9 Marathi]'विकासाचा निधीबाबत नव्या पालकमंत्र्या...