[महाराष्ट्र टाईम्स]कुंकवाची साथ का सोडा?
पती गमावलेल्या मीनाताईंना सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू
पुणे : भारतातील जुनाट प्रथांना मूठमाती देणारे आधुनिक विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आजवर अनेक प्रसंग आणि घटनांनी वेळोवेळी आपल्या पुरोगामीपणाची प्रचिती दिली आहे. याच उदात्त परंपरेला साजेसा असा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमी आपल्या मतदारसंघात ॲक्टिव्ह असतात. या दौऱ्यात त्या अनेक सर्वसामान्य नागरिकांच्यी देखील भेटीगाठी घेत असतात. सुळेंच्या दौऱ्याची नेहमीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होते. सुप्रिया सुळेंनी ज्येष्ठ नेते रामदास नाना दिवेकर यांच्या निधनाने वैधव्य आलेल्या मीनाताईंना कुंकू लावलं. या पुरोगामी पावलाची सामाजिक वर्तुळातही आता चर्चा होत आहे.
सुप्रिया सुळे नुकत्याच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. दौंड तालुक्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील वरवंड येथील ज्येष्ठ नेते रामदास नाना दिवेकर यांचे नुकतेच निधन झाले. या दौऱ्यात त्यांनी त्यांनी दिवेकरांच्या पत्नी मीनाताई दिवेकर व कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जे केलं त्यामुळे सर्वांना अभिमान वाटला.
सुप्रिया सुळेंनी मीना ताई दिवेकर यांच्या कपाळाला कुंकू लावले. यामुळे समाजात बदल होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जवळ असलेल्या सर्व महिलांनी देखील मीना ताई यांना कुंकू लावले. त्यांचे देखील सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. आता नेहमी कुंकू लावायचं, पाहा कशा छान दिसता, असं सुप्रिया सुळे म्हणत असल्याचं व्हिडिओत ऐकू येतं. हा एकूणच प्रसंग अंगावर रोमांच उभे करणारा ठरला.
पाहा व्हिडिओ :
महाराष्ट्रातील जनता नेहमीच प्रागतिक विचारांचा पुरस्कार करते. बारामती लोकसभा मतदारसंघातील वरवंड येथील ज्येष्ठ नेते रामदासनाना दिवेकर यांच्या निधनानंतर आज त्यांच्या पत्नी मीनाताई दिवेकर व कुटुंबियांंची सांत्वन भेट घेतली त्यावेळी मीनाताईंना कुंकु लावले. pic.twitter.com/3uZEHcFlJO
— Supriya Sule (@supriya_sule) December 27, 2022
याआधीही सुप्रिया सुळेंनी वैधव्य आलेल्या महिलेकडून कुंकू लावून घेतलं होतं. सुप्रिया सुळे उस्मानाबाद दौऱ्यावर असताना उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी गेल्या होत्या. याठिकाणी वसंतराव नागदे यांच्या सूनबाईही उपस्थित होत्या. पतीच्या अकाली निधनामुळे त्यांना वैधव्य आलेलं. मात्र, वसंतराव नागदे यांच्या सूनेने सुप्रिया सुळे यांना कुंकू लावत एक नवा पायंडा घालून दिला.
आजही समाजात विधवा महिलांना घर किंवा सार्वजनिक मंगल कार्यांपासून दूर ठेवले जाते. आपण विकासाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये आजही काही जुनाट आणि अनिष्ट प्रथा कायम असल्याचं पाहायला मिळतं. अशाच एका जुनाट प्रथेला सुप्रिया सुळे यांनी दौऱ्यात पुन्हा मूठमाती दिली.