2 minutes reading time (390 words)

[Abp माझा]40 व्या वर्षी माजी सैनिकानं MPSC परीक्षेत मिळवलं यश

40 व्या वर्षी माजी सैनिकानं MPSC परीक्षेत मिळवलं यश खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता स्पर्धा परीक्षेत यश मिळणाऱ्या अश्रय झुरुंगे यांची दौंडमध्ये सध्या चर्चा आहे. त्यांनी 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. सध्या ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिक अश्रय झुरुंगे यांना भेटून खासदार सुप्रिया सुळे यांनी खास सत्कार केला.

अक्षय झुरुंगे सध्या परिवहन खात्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल अध्यक्ष ज्योती झुरुंगे यांचे ते दीर आहेत. वयाच्या चाळीसाच्या वर्षी अभ्यास सुरू करणाऱ्या अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे भारतीय लष्करात सेवा केली आहे. या कालावधीत त्यांनी देशाची सेवा करताना बर्फाने वेढलेल्या लेह, सियाचीन, सिलिगुडी आदी गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या प्रदेशात देशाची सेवा केली आहे. तेथून निवृत्त होताना सुभेदार ते पदावर होते. त्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याची चर्चा आहे.

निवृत्तीनंतर गावी आल्यावर अक्षय झुरुंगे यांनी शेती करण्यास प्रारंभ केला; मात्र त्यांच्यातील अभ्यासू विद्यार्थी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी अभ्यास करायला सुरूवात केली. याशिवाय त्यांना शेतीही करायची होतीच. ती सुद्धा प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करायची होती. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत शेवग्याची शेती केली; आणि त्याचवेळी एकीकडे शेती करता करता त्यांनी जोमाने अभ्यास करत एमपीएससी परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. सध्या ते राज्याच्या परिवहन खात्यात अधिकारी असून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत.

दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या पाटेठाण येथे गेल्या असता त्यांनी आवर्जून झुरुंगे यांची भेट घेत त्यांचा खास सत्कार केला. लष्करी सेवेनंतर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी वयाच्या चाळिसाव्या वर्षी अभ्यास सुरू करून परीक्षा देणे, त्यात उत्तम गुणांनी पास होऊन शासकीय सेवा बजावताना जनसेवा करणे या झुरुंगे यांच्या आंतरिक उर्मीचे खासदार सुळे यांनी भरभरून कौतुक केले. त्याशिवाय पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही, तर नव्या पिढीने झुरुंगे यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असेही त्या यावेळी म्हणाल्या. माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्ष वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड शहराध्यक्ष गुरमुख नारंग, ज्योती झुरंगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

[महाराष्ट्र टाईम्स] देशाच्या सीमेचं १७ वर्ष रक्षण,...
[महाराष्ट्र टाईम्स]कुंकवाची साथ का सोडा?