2 minutes reading time (407 words)

[sarkarnama]राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह गेल्यानंतर सुप्रिया सुळेंचा पहिला शब्द...... 'अदृश्य शक्ती'!

राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह गेल्यानंतर सुप्रिया सुळेंचा पहिला शब्द...... 'अदृश्य शक्ती'!

Ajit Pawar and Sharad Pawar News : महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निकाल निवडणूक आयोगाने दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटामध्ये पक्ष आणि चिन्ह यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. दोन्ही पक्षाकडून निवडणूक आयोगात आपली बाजू भक्कमपणे मांडली जात होती.

अखेर आज निवडणूक आयोगाने याबाबत अंतिम निकाल अजित पवारांच्या बाजूने दिला. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळालं. या निकालानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत, खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

सुळे(Supriya Sule) म्हणाल्या, 'अदृश्य शक्ती, त्यांचं हे यश आहे. कारण ज्या माणसाने पक्ष स्थापन केला. त्याच्याकडून पक्ष काढून घेणं. हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल. पण मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण, हे अपेक्षित होतं. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांना असंच केलं. शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा मराठी माणसाचाच पक्ष. त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय़ घेत असते, त्याचं हे आणखी एक उदाहरण आहे.'

याशिवाय 'बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात जे झालं, तेच आज शरद पवार ज्यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला. शून्यातून स्वत:चं आयुष्य उभा केलं. त्यांचा कोणीही काका, मामा, वडील, राजकारणात नव्हते. शरद पवारांना त्यांचं सगळं राजकीय आयुष्य ते शून्यातून उभा केलेलं आहे आणि त्यांनी स्वत: पक्ष उभा केलेला आहे. आज तो पक्ष त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. याचं मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण, ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेचं केलं, तसंच आमचंही करत आहेत.' असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार(Sharad Pawar) यांच्या गटात पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरू होती. याबाबत निवडणूक आयोगात ही सुनावणी होती. प्रत्येक सुनावणीला शरद पवार हजर होते. अजित पवार गटाकडून आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करण्यात आला होता आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे गेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे आता अजित पवार असणार आहेत.

पक्षात फूट नाही असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं होतं आणि बहुमताचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. त्यावरून निवडणूक आयोगाने आकडेवारी पाहून हा निर्णय दिल्याचं दिसत आहे. एकाप्रकारे ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात जो निकाल लागला, तसाच निकाल आता राष्ट्रवादीबाबत लागल्याचे दिसत आहे. 

[BBC News Marathi]'अदृश्य शक्तीचा विजय'
[Maharashtra Times]आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सु...