[My Mahanagar]मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे - सुप्रिया सुळे
मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून वाद होतानाचे चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कशी गुप्तपणे भेट घेतली, याबाबत खुलासा केला होता. मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून ते किमान 10 ते 12 वेळा वेश बदलून कसे गेले होते हे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यावेळी ते बनावट नावाने गेल्याचे देखील उघड केले होते. त्यावरून आता या चर्चांना उधान आले आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टच्या चौकशीची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्र्यांना विमानाने कसे चोरून गेले, याबाबत चौकशी व्हायलाच पाहीजे. असे काय यांच्यात शिजत होते की, चोरून भेटायला गेले होते. तसेच असे बनावट नावाने जर गेले असतील, तर असे कृत्य कोणीही आंतकवादी देखील करु शकतात, त्यामुळे धोका निर्माण नाही होणार का ? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील आज (मंगळवार) सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी माध्यमांना माहिती दिली की, ते मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेश पालटून गेले. नुसते वेश पालटून गेले नाही, तर बनावट नावाने गेले. त्यांनी वेश बदलला हा प्रश्न नाही आहे, तर विमानतळाची सुरक्षा किती ढिसाळ आहे की, कोणताही माणूस बनावट नावाने वेश पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्लीसारख्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो. याचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी या काळामध्ये जो खेळ झाला आहे. त्यात या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सामील आहेत. अजित पवार यांचे उदाहरण घेऊन अतिरेकी नाव बदलून, वेश बदलून देशात घुसू शकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला.